केळी व्यापाऱ्यांच्या एकाधिकारशाही व मनमानीविरोधात शेतकरी एकवटले

0

रावेर :-  बोर्ड भावापेक्षा कमी भावांनी केळीची कापणी केली जात असल्याने व्यापाऱ्यांच्या एकाधिकारशाही व मनमानी व्यापारवर्गावर अंकुश नसलेल्या बाजार समितीच्या नाकर्तेपणाविरोधात हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांनी शुक्रवारी तहसील कार्यालयावर व त्यापाठोपाठ बाजार समितीच्या कार्यालयावर धडक दिली. केळी भावासाठी राजकीय बॅनर विना निघालेला हा तालुक्यातील पहिलाच मोर्चा ठरला. त्यात केवळ सोशल मीडियाच्या आवाहनानंतर तरुण शेतकऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने सहभाग घेतला. छोरिया मार्केटपासून मोर्चाला सुरुवात झाली.

पंधरवड्यापूर्वी १४०० रुपयांपर्यंत गेलेले केळीचे बोर्ड भाव दहा दिवसातच १०४५ रुपयांपर्यंत खाली घसरले. त्यातही काही व्यापारी बोर्डभावापेक्षा ६०० रुपये कमी म्हणजेच केवळ ४०० रुपयांनी केळीची कापणी करतात. यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. या नाराजीला वाट करून देण्यासाठी त्यांनी शुक्रवारी (दि.१४) रावेर तहसीलवर धडक दिली.

दुष्काळामुळे रावेर तालुक्यातील केळी बागायती संकटात आहे. अशाही स्थितीत शेतकऱ्यांनी काळ्या मातीत घामाचे सिंचन करून केळी बागा जगवल्या. त्यात पुन्हा वादळी पावसाने कापणीवर आलेल्या केळीचा घात आहे. या आपत्तीतून बचावलेल्या केळीला गेल्या पंधरवड्यापर्यंत १४०० रुपयांपर्यंत भाव मिळाले. मात्र, कोणतेही ठोस कारण नसताना गेल्या दहा दिवसात भाव ४०० रुपयांनी घसरले. सध्या बोर्डावर केळीला १०४५ रुपये भाव दिसत असला तरी प्रत्यक्षात ४०० रुपयांनी केळीची कापणी होते. म्हणजे क्विंटल मागे ६०० रुपये कमी मिळतात. हा सर्व प्रकारावर नियंत्रण असलेली रावेर बाजार समिती हातावर घडी, तोंडावर बोट ठेवून असल्याने शेतकऱ्यांनी शुक्रवारी रावेर तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. तहसीलमध्ये नायब तहसीलदार वैशाली देशमुख यांना निवेदन देण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.