औरंगाबादच्या नामांतरावर मंत्री गुलाबराव पाटलांची प्रतिक्रिया, म्हणाले….

0

जळगाव : औरंगाबाद शहराचं नाव संभाजीनगर करावं या मुद्द्यावरून सध्या महाराष्ट्राच राजकारण चांगलच तापलं आहे. औरंगाबादच्या नामांतरावरुन भाजपकडून महाविकास आघाडीवर टीका केली जात आहे. पण, महाविकास आघाडीतील काँग्रेसकडून याला विरोध करण्यात येत आहे. त्यामुळे औरंगाबादच्या नामकरणावरुन राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं आहे. दरम्यान, यावर राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

औरंगाबादचे नामकरण संभाजीनगर व्हावे, ही पूर्वीपासून बाळासाहेब ठाकरे यांची इच्छा होती. ही काय शिवसेनेची आजची घोषणा नाही. संभाजीनगर नाव देणे काही चुकीचे नाही. या प्रश्नी तोडगा काढण्यासाठी आम्ही तिन्ही पक्ष एकत्र बसणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी देखील सांगितले आहे, असे ते म्हणाले.

औरंगाबाद शहराच्या नामांतराबाबत शिवसेनेची भूमिका आधीपासूनच स्पष्ट आहे. शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी स्वतः औरंगाबाद शहराचे नामकरण ‘संभाजीनगर’ झाले पाहिजे, अशी इच्छा व्यक्त केली होती. आजपर्यंत एकाही शिवसैनिकाच्या मुखातून या शहराचा उल्लेख औरंगाबाद असा येत नाही. तो संभाजीनगर असाच येतो. याप्रश्नी महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष एकत्र बसून तोडगा काढतील, अशी भूमिका शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी मांडली.

फडणवीसांनी आम्हाला हिंदुत्त्व शिकवू नये –

गुलाबराव पाटील यांनी यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या शिवसेनेवरील टीकेचा समाचार घेतला. ‘हिंदुत्त्व कुणाचे बदलले आहे, हे कोणाच्या सांगण्यावरून ठरत नाही. शिवसेनेचा जन्म हा हिंदुत्त्वापासून झाला आहे. शिवसेना जेव्हा राज्यात आली तेव्हा ती मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी आली. त्यामुळे फडणवीसांनी आम्हाला हिंदुत्त्व शिकवू नये. शिवसेनेच्या स्थापनेनंतर विलेपार्लेमधून जे आमदार निवडून आले, त्यांची निवडणूक फक्त हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावर रद्द झाली होती, हे फडणवीसांनी विसरू नये’, असा टोलाही गुलाबराव पाटील यांनी यावेळी फडणवीसांना लगावला.

Leave A Reply

Your email address will not be published.