एसटी’ची रुतलेली चाके धरू लागली वेग ; पंधरा दिवसांत ९५ लाखांपर्यंत उत्‍पन्न मिळाले

0

जळगाव : कोरोनाच्‍या पार्श्वभूमीवर लॉकडाउनमुळे एसटी सेवा गेल्या पाच महिन्यांपासून बंद होती. मात्र, २० ऑगस्‍टपासून नियम व अटी लावून जिल्ह्याबाहेर बावीस प्रवासी घेऊन बस सुरू करण्यास परवानगी देण्यात आली. आता ‘एसटी’ची रुतलेली चाके आता हळूहळू वेग धरू लागली आहेत. बिघडलेले वेळापत्रकदेखील सुधारत असून, बस झाल्‍यापासून अर्थात मागील पंधरा दिवसांत जळगाव विभागाला आजअखेरपर्यंत साधारण ९५ लाखांपर्यंत उत्‍पन्न मिळाले आहे.

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्‍यानंतर लॉकडाउन पुकारण्यात आला होता. यानंतर अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली. अशा स्‍थितीत म्‍हणजे चार- साडेचार महिने सार्वजनिक प्रवासी वाहतुकीला बंदी राहिली. यामध्ये सर्वाधिक फटका एसटी महामंडळाला बसला असून, या काळात उत्‍पन्न मिळत नसल्‍याने ‘एसटी’ने मालवाहतूक सुरू केली. यातही हवे तसे उत्‍पन्न मिळत नसल्‍याने तोटाच सहन करावा लागत होता. मात्र, २० ऑगस्‍टपासून नियम व अटी लावून जिल्ह्याबाहेर बावीस प्रवासी घेऊन बस सुरू करण्यास परवानगी देण्यात आली. मात्र, सुरवातीला अल्‍प प्रतिसाद मिळाला. यानंतर मात्र आता ‘एसटी’ उत्‍पन्नाच्या दृष्‍टीने मार्गक्रमण करू लागली आहे.

बससेवा सुरू करण्यास परवानगी दिल्‍यानंतर जळगाव विभागातून २० ऑगस्‍टला पहिली बस सोडण्यात आली. या दिवशी विभागातील अकरा आगारांमधून दिवसभरात तीनशेहून अधिक फेऱ्या सुटल्‍या होत्‍या. यानंतर दरदिवशी प्रवासी संख्या वाढत राहिली आणि तशा बसफेऱ्यांमध्येही वाढ करण्यात आली. यामुळे सद्यःस्‍थितीत जळगाव विभागाला दिवसभरात होणाऱ्या फेऱ्यांमधून नऊ ते दहा लाखांचे उत्‍पन्न मिळत आहे. यामुळे मागील पंधरा दिवसांत जळगाव विभागाला ९५ लाखांचे उत्‍पन्न मिळू शकले आहे.

जळगाव- पुणे रोज धावणार 
लांब पल्ल्‍यात जळगावसाठी पुण्यासाठीची बस अधिक उत्‍पन्न देणारी आहे. सध्या रेल्‍वेदेखील बंद असल्‍याने खासगी ट्रॅव्हल्‍सचालक हे अवाजवी भाडे आकारून वाहतूक करीत आहेत. यामुळे आता जळगाव- पुणे अशा रोज रात्री दोन सेमी स्लीपर बस सोडण्यात येणार आहेत. यासाठीचे ऑनलाइन आरक्षणदेखील सुरू करण्यात येत असून, याची सुरवात उद्यापासून (ता. ४) करण्यात येत असल्‍याचे विभाग नियंत्रक राजेंद्र देवरे यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.