उन्नाव (उत्तर प्रदेश) : हैदराबामधील महिला डॉक्टरला बलात्कारानंतर जाळून मारल्याची घटनेला ताजी असताना उत्तर प्रदेशतील उन्नाव येथे सामूहिक बलात्कार पीडितेला मारहाण करत जिवंत जाळण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण उन्नाव हादरले आहे. दरम्यान, पोलिसांनी या पीडितेला जाळून मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या ६ आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू आहे. पीडितेला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.
पीडिता आज (गुरुवारी) पहाटे चार वाजता रायबरेलीला जाण्यासाठी ट्रेन पकडण्यासाठी बैसवारा बिहार रेल्वे स्थानकात जात असताना ही घटना घडली. गौरा फाट्यावर गावातील हरिशंकर त्रिवेदी, किशोर शुभम, शिवम, उमेश यांनी पीडितेला घेरले आणि तिच्या डोक्यावर काठी आणि गळ्यावर चाकूने वार केले. दरम्यान, चक्कर आल्याने पीडिता खाली कोसळली. त्यानंतर या सहा जणांनी तिच्यावर पेट्रोल टाकून तिला पेटवून दिले, अशी माहिती पीडितेने दिली आहे. पीडितेवरील सामूहिक बलात्कार प्रकरणाचा तपास रायबरेली पोलिसांनी केला होता. या प्रकरणाचा हे आरोपी जामिनावर सुटले आहेत.