ई-तिकीटांतून दहशतवाद्यांना निधी पुरवल्याचा संशय ; सॉफ्टवेअर इंजिनिअरला अटक

0

नवी दिल्ली :  रेल्वे पोलिसांनी रेल्वेच्या ई तिकीटांच्या बेकायदेशीर रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या संदर्भात झारखंडमधील मूळ रहिवासी असलेल्या एका सॉफ्टवेअर इंजिनिअरला रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे. या सॉफ्टवेअर इंजिनिअरने मद्रास (चेन्नई) मधून शिक्षण घेतले असून त्याने स्वतःच्या बळावरच सॉफ्टवेअर विकसित करण्याचे तंत्र शिकून घेतले आहे. या सॉफ्टवेअर टेक्‍नोलॉजीचा लाभ घेऊन त्याच्या बेकायदेशीर तिकीट विक्रीच्या रॅकेटचे धागेदोरे दहशतवाद्यांच्या अर्थसहाय्यापर्यंत पोहोचले असल्याचा संशय रेल्वे पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने व्यक्‍त केला आहे.

गुलाम मुस्तफा असे या सॉफ्टवेअर इंजिनिअरचे नाव असून त्याला भुवनेश्‍वरमधून अटक करण्यात आले आहे. त्याच्याकडे “आयआरसीटीसी’ची 563 ओळखपत्रे आहेत. याशिवाय एसबीआयच्या 2,400 शाखा, 600 ग्रामीण बॅंकांची यादी आहे. या सर्व बॅंक खात्यांमध्ये त्याचे खाते असल्याचा संशय आहे, असे रेल्वे सुरक्षा दलाचे महासंचालक अरुण कुमार यांनी सांगितले.

गेल्या दहा दिवसांपासून गुप्तचर विभाग, स्पेशल ब्युरो, सक्‍तवसुली संचलनालय, राष्ट्रीय तपास संस्था आणि कर्नाटक पोलिसांनी मुस्तफाची चौकशी केली आहे. त्याच्या या बेकायदेशीर व्यवहारांमधून मनी लॉन्डरिंग आणि टेरर फायनान्सिंगची शक्‍यताही आहे. या रॅकेटचा मुख्य सूत्रधार म्हणून हामिद अशरफ यांचे नाव पुढे आले आहे. त्यास महिन्याला 10-15 कोटी रुपयांचा मिळत असावा, अशी शंका असल्याचे कुमार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

अशर्रफ हा देखील एक सॉफ्टवेअर इंजिनिअर असून 2019 मध्ये गोंडा शाळेत झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणी तो प्रमुख संशयित आहे. सध्या तो दुबईला पळून गेल्याचा संशय आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.