बारावीनंतर होणाऱ्या विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीच्या सीईटी रद्द करावी

0

अमळनेर (प्रतिनिधी) :- इयत्ता बारावी नंतर होणाऱ्या विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीच्या सीईटी रद्द करण्यात यावी अशी मागणी फार्मसी स्टूडेंट कॉन्सिलचे अध्यक्ष भुषण भदाणे यांनी केली आहे.

त्या बाबतीत निवेदन हे उच्च तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांना ई मैलद्वारे पाठवण्यात आले आहे. सदर निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, महाराष्ट्र राज्यामध्ये प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व महाविद्यालयाच्या सर्व परीक्षा रद्द झालेल्या आहेत. त्यामुळे इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असताना पुन्हा त्यांना सीईटीची आणखी एक परीक्षा या कोरोना संसर्गाचा वातावरणात द्यायला भाग पाडणे चुकीचे वाटते. ग्रामीण भागात राहणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या साठ टक्‍क्‍यांच्या दरम्यान आहे व त्यामध्ये आता शहरातील विद्यार्थी त्यांच्या मूळ गावी ग्रामीण भागात आल्यामुळे ती संख्या 75 टक्‍क्‍यांच्यावरती गेली आहे. आणि या विद्यार्थ्यांचे पालक कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सीईटी परीक्षेला विद्यार्थ्यांना पाठवण्यास घाबरत आहेत. त्यामुळे सीईटीला बसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी होऊन हे विद्यार्थी व्यावसायिक अभ्यासक्रमापासून वंचित राहतील.

तसेच आजपर्यंत सर्व सीईटींच्या परीक्षा या बारावीच्या निकालापूर्वी होत होत्या व या सर्व सीईटींचा निकाल हा बारावीच्या निकालाबरोबर लागत होता. परंतु यावर्षी बारावीचा निकाल 15 जुलैपर्यंत लागणार आहे व सीईटीचे कुठलेही नियोजन आत्तापर्यंत दिसत नाहीये. कारण सीईटीच्या दोनदा तारखा पुढे ढकलल्या आहेत. त्यामुळे जेवढा उशीर होईल तेवढे विद्यार्थी मानसिक तणावात राहतील. परीक्षा रद्द करून बारावीच्या मार्कांच्या आधारावरती जर प्रवेश दिले तर प्रवेश प्रक्रिया लवकर संपून ऑनलाइनद्वारे अभ्यासक्रम शिकवण्यास सुरुवात होईल व लॉकडाऊन संपल्यानंतर ज्यावेळेस मुले महाविद्यालयात येथील त्यावेळेस त्यांची प्रात्याक्षिके पूर्ण केली जातील व त्यामुळे त्यांचा सर्व अभ्यासक्रम वेळेत पूर्ण करण्यास मदत होईल.

त्या बरोबरच बारावी सायन्स इतर बोर्डातून उत्तीर्ण होणाऱ्या म्हणजे सीबीएससी व आयसीएससी या बोर्डातून पास होणाऱ्या विद्यार्थ्यांचे एकूण अर्जामधील प्रमाण पाहून त्याप्रमाणे त्यांना जागा वाटप केले तर बारावीच्या मार्कांच्या आधारे प्रवेश करण्यास कुठलीही अडचण येणार नाही. महाराष्ट्र शासनाने विनाअनुदानित व्यावसायिक महाविद्यालयांसाठी केलेल्या कायद्यामध्ये विना सीईटी प्रवेश देण्याची तरतूद असून त्याचबरोबर भारत देशातील काही राज्ये विना सीईटी व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश देत आहेत. यापूर्वीही महाराष्ट्र राज्यामध्ये विना सीईटी प्रवेश प्रक्रिया राबवली गेलेली आहे, त्यामुळे या कोरोना संसर्गाच्या परिस्थितीमध्ये इयत्ता बारावीनंतर चे होणारे व्यावसायिक अभ्यासक्रमांचे प्रवेश हे विना सीईटी व्हावेत ही विनंती भुषण संजय भदाणे, अध्यक्ष, फार्मसी स्टूडेंट कौन्सिल महाराष्ट्र राज्य यांनी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.