आरोपीला शिक्षा दिल्याशिवाय मी स्वत: स्वस्थ बसणार नाही – मुख्यमंत्री

0

मुंबई: हिंगणघाट येथील जळीत पीडितेची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. आज सकाळी पीडित तरुणीचा मृत्यू झाला. पीडितेच्या मृत्यूनंतर महाराष्ट्रात संतापाची लाट पसरलीय. दरम्यान, यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरोपीला फाशीवर लटकावण्यासाठी सरकार सर्वोतोपरी प्रयत्न करेल व आरोपीला शिक्षा दिल्याशिवाय मी स्वत: स्वस्थ बसणार नाही, अशी ग्वाही दिली. तसेच हा खटला जलदगती न्यायालयात चालविण्याचे निर्देशही दिले आहे.

सर्वांनी धीर धरा. जे आरोपी आहेत त्यांच्यावरचा गुन्हा लवकरात लवकर सिद्ध करून पीडितेच्या हत्याऱ्याला शिक्षा दिल्याशिवाय हे सरकार स्थिर बसणार नाही. सर्वांच्या भावनेशी मी सहमत आहे. अशा घटनेला थारा नाही आणि आरोपींना दया माया दाखवली जाणार नाही. या सर्वांचा पाठपुरावा करू. निकाल लागल्यावर अंमलबजावणीसाठी मी उशीर होऊ देणार नाही, असं उद्धव ठाकरे यांनी नमूद केलं. हैदराबादसारखा कायदा न करता त्यात बदल करून कायदा कडक करण्यात येईल जेणेकरून अशा प्रकारचे कृत्य कोणी करणार नाही, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

सदर तरुणीच्या मृत्यूनंतर दारोडा गावातील ग्रामस्थांचा उद्रेक झाला असून या ग्रामस्थांनी रास्तारोकोही केला आहे. त्याबाबत मुख्यमंत्र्यांना विचारले असता या भगिनीच्या कुटुंबियांची व दारोडा गावातील लोकांची मानसिक अवस्था आपण समजू शकतो, असं ते म्हणाले. थोडासा धीर धरा. आरोपींना शिक्षा केली जाईलच. आपराध्याला शिक्षा दिल्याशिवाय मी स्वत: शांत बसणार नाही, असंही त्यांनी सांगितलं.

Leave A Reply

Your email address will not be published.