आनंदाची बातमी ! गृह, वाहन कर्ज होणार स्वस्त

0

नवी दिल्ली : सर्व बॅंकांचे व्याजदर आता रेपो दराचे जोडले जाणार आहेत. रिझर्व बॅंकेने तशी सूचना नुकतीच बॅंकांना केलेली आहे. बॅंकेच्या सूचनेनुसार घर, वाहन आणि छोट्या उद्योगांना दिलेल्या कर्जावरील फ्लोटींग दर हे रेपो दरांसी जोडले जाणार आहेत.

रिझर्व्ह बॅंकेने या अगोदर बॅंकांनी रेपो दरांच्या कपातीनंतर शक्‍य तितक्‍या लवकर व्याजदरात कपात करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार काही बॅंकांनी आपल्या काही कर्जाचे व्याजदर रेपो दराशी जोडले होते. मात्र आणखीही काही बॅंकांनी तसे केलेले नाही अशा तक्रारी रिझर्व बॅंकेकडे आल्यानंतर रिझर्व बॅंकेने आता कर्जाचे व्याजदर रेपो दराची जोडणे बंधनकारक केले आहे.

त्यामुळे ग्राहकांना लवकर रेपो दर कपातीचा फायदा मिळणार आहे. एमसीएलआरच्या पद्धतीनुसार बॅंकांचे व्याजदर रेपोदर कमी झाल्यास लवकर कमी होत नव्हते, असे आढळून आल्यानंतर आता सर्वच कर्जाचे व्याजदर हे रेपोदराशी १  ऑक्‍टोबरपासून जोडले जावेत असे रिझर्व्ह बॅंकेने म्हटले आहे. चालू आर्थिक वर्षात रिझर्व बॅंकेने रेपो दरात १.१० टक्‍क्‍यांनी कपात करूनही आतापर्यंत व्यवसायिक बॅंकांनी त्यांच्या व्याजदरात केवळ ०.४० टक्‍क्‍यांनी कपात केली आहे.

कर्जाचा उठाव कमी असल्यामुळे त्याचा विकास दरावर परिणाम होत असल्याची ओरड चालू आहे. त्यामुळे व्याजदर कमी व्हावेत असा दबाव रिझर्व्ह बॅंकेवर आहे. मात्र कर्जावरील व्याजदर रेपो दराप्रमाणे कमी झाल्यास त्या प्रमाणात ठेवीवरील व्याज दरही कमी होण्याची शक्‍यता आहे. मात्र याबाबत रिझर्व्ह बॅंकेने जारी केलेल्या पत्रकात काहीही भाष्य केलेले नाही. फक्त कर्जावरील व्याजदर एक ऑक्‍टोबरपासून कमी करण्याच्या सूचना करण्यात आलेल्या आहेत. यामुळे कर्जावरील व्याजदर कमी होऊन उत्सवांच्या काळात कर्ज मागणी वाढेल अशी शक्‍यता व्यक्त केले जाऊ लागले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.