आदरणीय पितृतुल्य व्यक्तिमत्त्व न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी यांचे निर्वाण

0

 

जगणं सार्थक करणार्‍या आदरणीय धर्माधिकारी साहेबांच्या कार्य-कर्तृत्वाची प्रेरक ज्योत सदैव तेवती राहील. त्यांना कृतज्ञतापूर्वक विनम्र अभिवादन करतो. ज्यांच्या सत्त्वशील व्यक्तिमत्त्वापुढं, जीवनमूल्यांच्या तत्त्वांपुढं, अधोरेखित करण्यासारखी सर्वात महत्त्वपूर्ण बाब म्हणजे आचरणापुढं कायम नतमस्तक रहावं, आदर्श जगणं समजून घ्यावं असं धर्माधिकारी साहेब प्रेरणादायी जगले.
महात्मा गांधीजींच्या जीवनव्रताचा, देशासाठी सर्वस्व त्याग करण्याचा, जीवनमूल्यांचे आचरण करताना कठोर परिश्रम घेण्याचा, यातना सहन करण्याचा संस्कार धर्माधिकारी परिवारावर होताच. घर-घराण्यातील मातृ-पितृ संस्कारांचे कृतिशील विद्यापीठ भरभक्कम होते. दादा धर्माधिकारींच्या तेजस्वीतेचा-तपस्वितेचा-तत्परतेचा विचार रक्तातच खोलवर मुरलेला. ङ्गवक्तृत्वाफला ज्ञानपरायण साधनेची निरंतर जोड लाभलेली. एकेक शब्द आचरणशील. विचार दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शक.
श्रद्धेय मोठेभाऊ आणि धर्माधिकारी साहेबांचे ऋणानुबंध गांधीजींच्या विचार-आचार सख्यत्वातून जुळले ते आयुष्यभरासाठी. गांधीजींच्या विचारांचा-भावभावनांचा, प्रयोगशीलतेचा, सद्मार्गाचा शक्तिशाली स्त्रोत प्रभावशाली होताच; आणखी एका महत्त्वपूर्ण संचिताने दोघांच्या हृदयाची गुंफण घट्ट विणली ते संचित म्हणजे कुटुंबसंस्थेचा विचार.
गांधीजींच्या प्रेरक कार्याला प्रात:स्मरणीय मानणार्‍या मोठ्याभाऊंना गांधीजींचे साहित्य, गांधीजींचे माणूस घडविणारे मूल्यात्मक प्रयोग, गांधीजींची ग्रामीण भारत विकास संकल्पना अशा एकूणएक संदर्भात संस्थात्मक कार्य साकार करायचे होते. मोठ्याभाऊंच्या अंत:करणातील या संकल्पनांना मृर्तस्वरूप ङ्गगांधी रिसर्च फाऊंडेशनफच्या माध्यमातून प्राप्त झाले. गांधी विचारांचे सदैव जागरण आणि आचरण करणार्‍या ङ्गगांधीतीर्थफला संपूर्णपणे सुयोग्य-परिपूर्ण-सद्सद्विचार-विवेक असणारी श्रेष्ठ व्यक्ती अध्यक्ष या नात्याने प्रमुख मार्गदर्शक असावी ही भाऊंची मन:पूर्वक सद्भावना होती. गांधीजींचे विचार आचरणात आणणार्‍या संकल्पनेमुळे कान्हदेशात-जळगावला ङ्गगांधी रिसर्च फाऊंडेशच्याफ माध्यमातून राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरील मल्टिमीडिया ऑडिओ गायडेड म्युझिअम अस्तित्वात आले.
धर्माधिकारी साहेबांचे वाचन-अभ्यास म्हणजे एक अखंड यज्ञच! त्यांच्या साहित्य संपदेतून, वेळोवेळी केलेल्या लेखनातून-भाषणातून प्राप्त होणारे विचारधन, उदाहरणे, दृष्टान्त माणसाला कृतिप्रवण करणारे. धर्माधिकारी साहेबांचे ङ्गमाणूसनामाफ हे पुस्तक युवापिढीसाठी अतिशय दिशादर्शक अनेकांनी या पुस्तकाची पारायणे केलेली विशेषत: महिलांच्या बाबतीत त्यांनी वेळोवेळी व्यक्त केलेला आदर संस्कृतीशील. ह्याच विचारांची फलश्रुती म्हणजे गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या संचालक मंडळावर सौ. ज्योती अशोक जैन यांच्याही नावाचा आग्रह धर्माधिकारी साहेबांनी धरला. घरातील स्त्रिया-माता-भगिनी कुटुंब संस्कृतीला भरभक्कम ठेवतात, त्यांचा विविध सामाजिक-राष्ट्रीय कार्यात सहभाग असायलाच हवा ही धर्माधिकारी साहेबांची व्यापक भूमिका. माता-भगिनींचा, त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा योग्यवेळी योग्य पद्धतीने सन्मान झाला पाहिजे ही त्यांची कृतिशील दृष्टी. घरात नव्याने पदार्पण झालेल्या मोठ्याभाऊंच्या नातसूनेला अंबिकालासुद्धा धर्माधिकारी साहेब गांधीजींच्या कार्याविषयी चिंतनिका देत. त्यांची ही आचार-विचारातील शुद्धता, संस्कारशीलता अविस्मरणीय.
गांधीतीर्थद्वारे ङ्गबा-बापूफ यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त भारतातील 150 गावांच्या पाणी, स्वच्छता, आरोग्य, शिक्षण, स्वावलंबन या कृतिकार्यक्रमाचा संकल्प करताना धर्माधिकारी साहेबांनी माँ कस्तुरबाजींच्या समर्पित जीवनाचा पुन्हापुन्हा आदरपूर्वक उल्लेख केला होता. धर्माधिकारी साहेबांच्या कार्य-कर्तृत्वापुढे आम्ही जैन परिवार, जैन उद्योग समूहातील सहकारी, गांधी रिसर्च फाऊंडेशनचे सहकारी-त्यांनी घडविलेले कार्यकर्ते कायम नतमस्तक राहू आणि कृतज्ञही. त्यांच्या प्रेरणेने हाती घेतलेल्या कार्याची निश्चितच संकल्पपूर्ति करू हीच त्यांना श्रद्धांजली!

Leave A Reply

Your email address will not be published.