आईविषयी अपशब्द वापरल्याच्या रागापोटी रावेरात खून

0

रावेर प्रतिनिधी : येथील संभाजी नगरात शेजाऱ्यावर तलवारीने प्राणघातक हल्ला करून खून केल्याची खळबळजनक घटना घडली. राजू देवराम चौधरी (वय ५५) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. सोमवारी (दि.१४) मध्यरात्री रवींद्र मराठे याने चौधरींवर हल्ला केला. संशयिताच्या आईविषयी अपशब्द वापरल्याच्या रागापोटी हा हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली.

संभाजी नगरातील रहिवासी राजू देवराम चौधरी हा शेजारी राहणाऱ्या रवींद्र मराठे याची आई पुष्पाबाईला वाईट बोलला होता. याचा रवींद्रला राग आला. त्याने सोमवारी रात्री पावणे अकराच्या सुमारास घरासमोर राजू चौधरीच्या डोक्यात तलवारीने प्राणघातक हल्ला केला. त्यात राजू चौधरी हे गंभीर जखमी झाले. यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी जळगावला दाखल करण्यात आले होते.

ही माहिती मिळताच डीवायएसपी नरेंद्र पिंगळे, पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे, एपीआय शीतल कुमार नाईक, पीएसआय मनोजकुमार वाघमारे, मनोहर जाधव, अनिस शेख व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठले. दरम्यान, हल्ल्यात गंभीर जखमी राजू चौधरी यांचा जळगाव येथील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना मंगळवारी दुपारी मृत्यू झाला. तर गणेश देवराम चौधरी यांच्या फिर्यादीवरून रवींद्र संतोष मराठे (रा.संभाजीनगर, रावेर) याच्याविरुद्ध खुनाचा तसेच बेकायदा शस्त्र बाळगल्याने गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी रवींद्र मराठेला अटक केली. त्याने हल्ल्यात वापरलेली तलवार जप्त केली. न्यायालयाने त्याला तीन दिवस पोलिस कोठडी सुनावली.

Leave A Reply

Your email address will not be published.