अनाधिकृत बांधकाम करणाऱ्यांवर कारवाईची बडगा !

0
‘लोकशाही’ चा दणका
 
बोदवड प्रतिनिधी – शहरातील भुसावळ रोडवरील महसूल विभागाच्या जागेत गट नं 13/1 मध्ये अनाधिकृत बांधकाम सुरू असल्याची बातमी सर्व प्रथम दैनिक लोकशाहीने दि.12 रोजी प्रकाशित केली होती.या बातमीची दखल तहसीलदार श्री.आर.आर.जोगी यांनी घेत तात्काळ सदरचे बांधकाम बंद पाडत बोदवड तलाठी यांना चौकशी अहवाल पाठविण्याचे आदेश दिले होते.तहसिलदार यांच्या आदेशानुसार बोदवड तलाठी श्री.निरज पाटील यांनी तहसीलदार यांच्याकडे चौकशी अहवाल सादर केला असून सदरची जागा महसूल प्रशासनाच्या हद्दीत असून अनाधिकृत बांधकाम केले असल्याचे व या गटात इतरांनाही अतिक्रमण केल्याचे नमूद करण्यात आले असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
तहसीलदार यांच्याकडून संबंधित जागेची पाहणी करण्यात आली असून महसूल पुरावे गोळा करण्यात आले आहेत.तरी सखोल चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार श्री.जोगी यांनी यावेळी दिली तसेच नगरपंचायत प्रशासनाकडून सदर बांधकामाला परवानगी दिली नसल्याचेही याबाबत बोलतांना नगर पंचायत मुख्याधिकारी श्री.चंद्रकांत भोसले यांनी सांगितले.त्यामुळे महसुलच्या जागेत अनाधिकृत बांधकाम करणाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार आहे.त्यामुळे संबंधित व त्या हद्दीत अतिक्रमण करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.शहरात इतरांनीही अनाधिकृत बांधकाम केले असल्याचे बोलले जात असून गेल्या दोन वर्षांपूर्वी नव्याने स्थापन झालेल्या बोदवड नगरपंचायतीवर प्रशासक म्हणून तहसीलदार श्री.भाऊसाहेब हे असतांना त्यांनी नगरपंचायत कर्मचारी यांना पाठवून हे काम तातडीने थांबवले होते.असे चर्चिले जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.