मुद्रांक शुल्क चुकवणाऱ्यांना दिलासा

0

 

लोकशाही न्युज नेटवर्क 

राज्यात मुद्रांक शुल्क चुकविणाऱ्यांसाठी राबविण्यात आलेल्या अभय योजनेची मुदत संपुष्टात आली असून, त्याला येत्या 31 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. ही मुदतवाढ देताना आता महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास महामंडळ (म्हाडा), शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ (सिडको), महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) तसेच महानगरपालिका, नगरपंचायतीच्या जागांवर विकसित झालेल्या इमारतींमधील रहिवाशांनाही योजना लागू करण्याचाही निर्णय सरकारने जाहीर केला आहे. यामुळे या वर्गाला दिलासा मिळण्याची चिन्हे आहेत.

राज्य सरकारने आतापर्यंत 1980 ते 2000 या दरम्यान चुकीचा मुद्रांक भरणाऱ्यांसाठी ‘अभय योजना’ लागू केली आहे. ही योजना दोन टप्प्यांमध्ये जाहीर करण्यात आली. एक डिसेंबर ते 31 जानेवारी 2024 आणि एक फेब्रुवारी ते 31 मार्चदरम्यान दोन टप्प्यांत योजना राबविण्यात आली आहे. 31 मार्चनंतर पुन्हा या योजनेला 30 जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. त्यामुळे या योजनेंतर्गत राज्यात सुमारे 400 कोटींचा महसूल वसूल करण्यात आला. या महसुलाची राज्याच्या तिजोरीत भर पडली. आता योजनेची मुदत 30 जूनला संपुष्टात आली. या योजनेला पुन्हा मुदतवाढ देण्याची मागणी करण्यात आली. त्या मागणीनुसार राज्य सरकारने पुन्हा मुदतवाढ देताना मुद्रांक शुल्क चुकविणाऱ्या वर्गात काही अन्य प्रकारच्या रहिवाशांचा समावेश केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.