‘कवितेच्या गहिऱ्या डोही’ या आशयगर्भ काव्यसंग्रहाचे प्रकाशन

जयश्री काळवीट यांच्या कवितांमध्ये संवेदनशील मनाचे प्रतिबिंब : ज्येष्ठ साहित्यिक शशिकांत हिंगोणेकर

0

 

भुसावळ | लोकशाही न्यूज नेटवर्क

आत्मशोधातून कवितेची रचना करत असताना कवी आपल्या संवेदनशील मनातून सभोवताले जगही टिपत असतो. जयश्री काळवीट यांची कविता आत्मशोध आणि सभोवतालचे अभिव्यक्ती मांडणारी आहे. त्यांच्या कवितेचे मुख्य सूत्र आशयगर्भ कविता असून कवितेच्या ’गहिऱ्या डोही’ या काव्यसंग्रहातून त्यांच्या संवेदनशील मनाचे प्रतिबिंब उमटले असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक शशिकांत हिंगोणेकर यांनी केले.

 

भुसावळ येथील ब्राह्मण संघात आयोजित कवयित्री जयश्री काळवीट रचित कवितेच्या गहिऱ्या डोही या काव्यसंग्रह प्रकाशन सोहळ्याच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. समारंभाचे अध्यक्षस्थानी मूजे महाविद्यालयाच्या सेवानिवृत्त मराठी विभाग प्रमुख डॉ. चारूता गोखले तर प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्त उपप्राचार्य तथा ज्येष्ठ साहित्यिक प्रा.डॉ. वा. ना. आंधळे, मूजे कनिष्ठ महाविद्यालयातील प्रा.सौ. संध्या महाजन, बालभारतीच्या मराठी भाषा अभ्यास मंडळाचे सदस्य डॉ. जगदीश पाटील यांच्यासह कवयित्री सौ. जयश्री काळवीट व मध्य रेल्वेतील लोको पायलट प्रसाद काळवीट उपस्थित होते.

 

प्रारंभी सरस्वती मातेच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले. मान्यवरांचा शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. कवितेच्या गहिऱ्या डोही या काव्यसंग्रह लेखनामागची भूमिका कवयित्री जयश्री काळवीट यांनी प्रास्ताविकात मांडली. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते काव्यसंग्रह प्रकाशन करण्यात आले. प्रा.डॉ. वा. ना. आंधळे यांनी आपल्या मनोगतातून कवयित्री जयश्री काळवीट यांच्या काव्यसंग्रहाचा सर्वांगसुंदर आढावा घेतला. काव्यसंग्रहातील कविता, त्यातील भाव, सौंदर्य, विचार तसेच प्रतिमा, प्रतीके, रूपके यांचा चपखलपणे केलेला वापर यासंदर्भात मुद्देसूद व सविस्तरित्या आणि कवितांची उदाहरणे देऊन काव्यसंग्रहाची वाङ्ममयीन मूल्ये कथन केले. तसेच त्यांच्या कविता आत्मशोधातून आत्मबोधाकडे जाणाऱ्या असल्याचेही त्यांनी सांगितले.

 

डॉ. जगदीश पाटील म्हणाले की, कवितेच्या गहिऱ्या डोही हा काव्यसंग्रह आत्मशोध, आत्मचिंतन व आत्मनिवेदन या मार्गाने जाणारा असल्याचे सांगून सृजनशीलता व शिक्षकाकडे असलेली निरीक्षण दृष्टी यांचा पुरेपूर वापर करून कवितांची निर्मिती झाली आहे. कवयित्री जयश्री काळवीट यांच्या कविता म्हणजे त्यांच्या भावविश्वाचे अनुभव कथन असल्याचेही त्यांनी सांगितले.

 

प्रा.सौ. संध्या महाजन म्हणाल्या की, जयश्री काळवीट यांच्या कवितांमध्ये स्त्रीचे दुःख आले असले तरी त्याचे रडगाणे त्यांनी गायलेले नाही. महिलांच्या आयुष्यात येणारे विविध प्रसंग व त्यावर करायची मात आणि त्यातून प्रतिभाशक्ती जोपासून केलेली काव्यनिर्मिती हेच कवीमनाचे उत्तम लक्षण असल्याचे त्यांनी सांगितले.

 

अध्यक्षीय मनोगतात डॉ. चारूता गोखले यांनी कवयित्री जयश्री काळवीट यांच्या काव्यामधील विविध कंगोरे आणि सौंदर्य याविषयी सांगून त्यांच्या कविता अनुभवांच्या काठावर घासून निर्माण झाल्या आहेत. स्त्रीच्या जीवनात येणारे प्रसंग व घटना यांच्याकडे पाहण्याचे संवेदनशील मन कवयित्री जयश्री काळवीट यांच्याकडे असल्याचेही त्यांनी सांगितले.

 

सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन कवयित्री संध्या भोळे यांनी केले. कार्यक्रमाच्या सुरूवातीला निमंत्रितांचे कवी संमेलन पार पडले. त्यात आम्ही सिद्ध लेखिका गृपच्या कवयित्रींसह राज्यभरातील कवींचा समावेश होता. त्यानंतर कवयित्री जयश्री काळवीट यांच्या सांगवी खुर्द जि. प. शाळेत शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांचे देखील बालकवी संमेलन पार पडले. त्याच्या अध्यक्षस्थानी वैभव भंडारी हे होते.

 

काव्यसंमेलनाचे सूत्रसंचालन आशा साळुंखे यांनी केले. काव्यसंमेलन व काव्यसंग्रह प्रकाशन सोहळ्याला रसिक श्रोत्यांची उपस्थिती होती.

Leave A Reply

Your email address will not be published.