पब्जी खेळताना तलावात पडला; विद्यार्थ्याचा वाढदिवशीच अंत

0

नागपूर, लोकशाही न्युज नेटवर्क 
नागपूरात पब्जी गेम खेळण्याचे व्यसन एका विद्यार्थ्याच्या मृत्यूचे कारण ठरले आहे. नागपूरच्या अंबाझरी तलावात असलेल्या पंप हाऊसमध्ये ही घटना घडली असून, पब्जी गेम खेळणाऱ्या या विद्यार्थ्याचा पंप हाऊसच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला. घटनेच्या दिवशी विद्यार्थ्याचा वाढदिवस होता आणि वाढदिवस साजरा करण्यासाठी तो आपल्या एका मित्रासोबत अंबाझरी तलावावर पोहोचला होता.

प्राप्त माहितीनुसार, जरीपटका येथील पुलकित राज शहदादपुरी (वय 16) असे विद्यार्थ्याचे नाव आहे. 11 जून रोजी पुलकितचा वाढदिवस होता. आदल्या दिवशी म्हणजे 10 जून रोजी रात्री 12 वाजल्यानंतर पुलकितने त्याच्या घरी कुटुंबीयांसह वाढदिवस साजरा करत केक कापला होता. पुलकित हा नुकताच दहावी पास झाला होता. त्याचे वडील कापड व्यापारी आहेत. पुलकित हा त्याच्या आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. मंगळवारी सकाळी वाढदिवस साजरा करण्यासाठी तो ऋषी खेमाणी या मित्रासोबत नाश्ता करण्यासाठी शंकर नगर चौकात गेला होता. तेथे पोह्याचे दुकान बंद असल्याने दोघेही अंबाझरी तलावाकडे फिरायला गेले. अंबाझरी तलावात असलेल्या पंप हाऊसजवळ बसून हे दोन मित्र पब्जी गेम खेळू लागले. या वेळी गार्डने शिट्टी वाजवली तेव्हा दोघेही घाबरले आणि तेथून निघून गेले.

मात्र, त्यावेळीही पुलकित पब्जी गेम खेळण्यात मग्न होता आणि हे बघून त्याचा मित्र तेथून निघून गेला. दरम्यान, पंप हाऊसमध्ये बनवलेल्या जाळीच्यामध्ये असलेल्या खड्ड्यातून पुलकित खाली पडला. पाण्यात पडल्याचा आवाज ऐकून त्याच्या मित्राने मागे वळून पाहिले असता त्याला पुलकित कुठेच दिसला नाही. मग ऋषी जोरात ओरडू लागला. मात्र तोपर्यंत पुलकित पाण्यात गायब झाला होता. त्यानंतर या घटनेची माहिती अंबाझरी पोलिसांना देण्यात आली.

Leave A Reply

Your email address will not be published.