वात्सल्याची बरसात करणारी “आई”

0

लोकशाही विशेष लेख 

आई, माता, जननी आणि माय या विविध नावानी जिला आपण पुकारतो त्या मातेला हृदयापासून धन्यवाद देण्याचा किवा मनापासून तिने आपल्यासाठी घेतलेल्या कष्ट, काळजीसाठी आभार मानण्याचा दिवस, म्हणजे जागतिक मदर्स डे जो यावर्षी 12 मे 2024 ला आहे. त्यानिमित्ताने…

आई म्हणजे ” आ म्हणजे आशीर्वाद आणि ई म्हणजे ईश्वर – ईश्वराने आशीर्वादाच्या स्वरुपात दिलेला हा अनमोल असा धागा/हिरा ज्याला आपण आई म्हणतो. आई ही नुसती माया करणारी, लाड करणारी नसते; तर प्रसंगी शिस्त लावणारी, कठोर वागणारी घराची एक प्रमुख सेनापती असते. अनेक गुणांचा संगम आणि नियोजनाची प्रचंड ताकद असणारी आई आपल्या कुटुंबाची जणू मुखीयाच असते.

असे म्हटले जाते, की ‘स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी’ आपल्याजवळ खुप पैसा आहे, धन आहे, पण मायेने डोक्यावरून हात फिरवणारी, मायेची सावली देणारी आई नाही, तर आपल्याला मिळालेल जीवन हे खर्‍या अर्थाने जीवनच नाही. पोरक्या असलेल्यांना आईचे महत्व विचारा तेव्हा कळेल. खरतर आपण आई ला टेक फॉर ग्रान्टेड समजत असतो. आपल्याला काय हवे काय नको हे समजून घेते ती आई, आई करेल ते, आई आहे तिला करावेच लागेल आपल्यासाठी, असा समज आपला असतो आपण कधीही तिने आपल्यासाठी दिवस भरात काय केले आहे त्याबद्दल आभार मानात नाही, का? तर तिचे ते कर्तव्य आहे म्हणून आपण ते टाळतो पण एक मुलगा आणि मुलगी म्हणून आपलेही तिच्या प्रती ऋण, प्रेम व्यक्त करणे आवश्यक आहे, तुम्ही तिला एकदा धन्यवाद म्हणा, आणि तिच्या चेहऱ्यावरील भाव बघा.. तेव्हा असे मदर्स डे रोजच साजरे होतील.. एखाद्या विशिष्ट दिवसाची गरज भासणार नाही.

खरच आई ही आपल्या जीवनात कितीतरी भूमिका पार पाडत असते. अगदी आईपासून ते आईपर्यंत. प्रत्येकाच्या जीवनात डोकावून पाहाल तर त्या व्यक्तीच्या प्रगतीचे श्रेय त्याच्या आईकडेच जाते. सुसंस्काराचे दर्शन घडविणारी, मार्गदर्शन करणारी, प्रेम करणारी, माया करणारी, तत्वज्ञान सांगणारी, खडसावणारी, चुका शोधून योग्य दिशा देणारी, मदत करणारी, लक्ष ठेवणारी, काळजी करणारी, जपणारी ती आई. अशा कित्येक भूमिका आई पार पाडते. आईची जागा तिच्याशिवाय कोणीच घेवू शकत नाही.

असे कित्येक उदाहरण आहेत कि केवळ आई होती म्हणून आम्ही घडलो. असे म्हणणारे, रघुनाथ माशेलकर आपल्या कोणत्याही भाषणात आईच्या पाठींब्या मुले, कष्टा मुळे मी घडलो असेच म्हणतात. नरेंद्र जाधव – ज्यांची आई अशिक्षित पण नरेंद्रला घडवण्यात त्यांचा खारीचा वाटा. शिवाजी महाराज, स्वामी विवेकानंद इ.

आईच्या सहवासात राहताना कधी आईच रहस्य आपण जाणूनच घेतले नाही. खरच तिच्याकडे एकदा शांतचित्ताने डोकावून पाहाल तर तिच्या स्मित हास्यात नक्कीच ईश्वराची प्रतीमा तुम्हाला दिसेल. हा माझा ठाम विश्र्वास आहे. कितीही चुका आपल्याकडून झाल्या तरी माफ करणारी ती फक्त आईच असते. खर तर रोजही आपण मदर्स डे साजरा करू शकतो पण कधी कधी आपल्या भावनांवर आपला इगो हावी होत असतो… आणि मनातील भावना मनातच राहत असतात. चला तर मग या जागतिक मातृदिनानिमित का होईना हा मदर्स डे आपल्या आई ला कुठल्यातरी रूपाने, कृतीने किवा भावनेने, काहीतरी देऊन किंवा बोलून साजरा करूया.

एका कवीने आईची थोरवी खूप चं सुदर शब्दात बद्ध केली आहे,

 

“आई तुझा हात,

वात्स्यल्याची बरसात,

आई तुझी माया,

जशी आभाळाची छाया,

आई तुझे शब्द,

जसा साठलेला मध,

आई तुझे ज्ञान,

जशी ग्रंथाची खान,

आई तुझी मूर्ती,

मिळे भक्ती आणी शांती…

 

“जागतिक मातृदिनाच्या सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा”

डॉ. रिता मदनलाल शेटीया

संस्थपिका, रिता इंडिया फाउंडेशन, पुणे

 

Leave A Reply

Your email address will not be published.