वरुणराजा देणार हुलकावणी ! पिक पेरणीची घाई ठरु शकते धोकेदायक

हवामान खात्याकडून दुजोरा

0

जळगाव , लोकशाही न्युज नेटवर्क 

वेळेआधी दाखल झालेला मान्सून हुलकावणी देणार असून शेतकऱ्यांनी पिक पेरणीची घाई करु नये असे तज्ज्ञांचे मत आहे. या संदर्भात आयएमडीने देखील शेतकऱ्यांना सावध केले असून पुढील पाच दिवस पावसात खंड पडणार असल्याचा अंदाज आहे. मान्सूनचा प्रवास वेळे आधीच झाला असून बऱ्याच ठिकाणी पेरणीची लगबग सुरु झाली आहे. मात्र पावसाचा खंड पडला तर लागवड केलेली शेती वाया जाण्याची शक्यता आहे.

मान्सूनबाबत भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, पुढील पाच ते सात दिवस राज्यातील काही भागात पावसाचा खंड राहण्याची शक्यता आहे. हवेच्या दाबाची स्थिती अनुकूल नसल्याने मौसमी वाऱ्यांचा वेग मंदावला आहे. यामुळे खंड पडण्याची शक्यता आहे. मान्सून निम्म्याहून अधिक  महाराष्ट्रात दाखल झाला आहे. मान्सूनचे आगमन होताच राज्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस झाला. काही जिल्ह्यांमध्येही पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी पेरणीची लगबग सुरू केली. मात्र याच दरम्यान हवेच्या दाबाची स्थिती अनुकूल नसल्याने वाऱ्यांचा वेग मंदावला आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहिती नुसार पुढील पाच ते सात दिवस काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा खंड राहण्याची शक्यता आहे. दि. 20 जूनच्या आसपास पावसाचा जोर वाढेल, असे हवामान खात्याने स्पष्ट केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.