पत्रकार किशोर रूपारेल यांना धमक्या देणाऱ्या आरोपींना तात्काळ अटक करा 

पत्रकारांचे मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांना निवेदन

0

 

खामगाव , लोकशाही न्युज नेटवर्क

पत्रकार किशोर (काका) रूपारेल यांना धमक्या देवून दहशत माजविण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोषींना तात्काळ अटक करुन कठोर करवाई करण्यात यावी, अशी मागणी खामगावातील पत्रकार बांधवांच्या वतीने आज दिनांक 18 जून 2024 रोजी उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी निदर्शने करून घटनेचा निषेध देखील नोंदविण्यात आला. दरम्यान तहसीलदार अतुल पाटोळे यांनी निवेदन स्वीकारले.

निवेदनामध्ये नमूद आहे की, लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून संबोधल्या जाणाऱ्या पत्रकारांकडून नेहमीच  अन्यायाला वाचा फोडण्याचे काम होत आले आहे. मात्र गेल्या काही वर्षात पत्रकारांना धमक्या देवून मुस्कटदाबी करण्याचा सातत्याने प्रयत्न केला जात आहे. खामगाव येथील जेष्ठ पत्रकार सांज दैनिक लोकोपचारचे संपादक किशोर काका रूपारेल हे नेहमीच निर्भिड पत्रकारिता करत आले आहेत. दरम्यान 14 जून रोजी त्यांच्या मेन रोडवरील लोकोपचार कार्यालयात 1.30 वाजताच्या सुमारास शहरातील युगधर्म पब्लिक स्कूलच्या प्राचार्यांसह 10 ते 12 महिला व पुरूष कर्मचाऱ्यांसह येवून किशोर रूपारेल यांच्यासोबत वाद घालुन शाळेचे संचालक गोपाल अग्रवाल यांच्याबाबत तुम्ही बातमी कशी काय छापली, त्या बातमीत छळ झालेल्या महिलेचे नाव का टाकले नाही, गोपाल अग्रवाल व युगधर्म पब्लिक स्कुल विरोधात बातमी लावण्याची तुमची हिम्मत कशी काय झाली असे प्रश्‍न करून जोरजोरात ओरडून कार्यालयातील टेबल बडवून धमकाविण्याचा प्रयत्न करण्यात आला. तसेच यानंतर गोपाल अग्रवाल व युगधर्म पब्लिक स्कूलच्या विरोधात बातमी लावाल तर याद राखा अशा धमक्या देवून दहशत माजविण्याचा प्रयत्न झाला.

वास्तविक पाहता युगधर्म पब्लिक स्कूल मधील एका शिक्षिकेने 3 मे रोजी संचालक गोपाल अग्रवाल याचे विरोधात शिवाजी नगर पोलीस स्टेशनला तक्रार दिली आहे. त्यामध्ये तु मला एकटी भेटत जा… सोबत कोणाला घेऊन येत जाऊ नको असे वाईट उद्देशाने गोपाल अग्रवाल बोलल्याचे शिक्षिकेने फिर्यादीत नमुद केले आहे. याबाबत खात्रिशीर माहितीवरूनच लोकोपचारमध्ये वृत्त प्रकाशित करण्यात आले आहे. मात्र गोपाल अग्रवाल याने स्वताचे पाप झाकण्यासाठी युगधर्म पब्लिक स्कूलमधील महिला कर्मचाऱ्यांना पुढे करत त्यांना चिथावणी देवून कार्यालयात पाठवून नुकसान करण्याचे व मारहाण करण्याचे उद्देशाने तसेच पत्रकारितेपासून परावृत्त करण्यासाठी पत्रकारावर दबाव आणून दहशत माजविण्याचा प्रयत्न केला आहे. गोपाल अग्रवाल हा व्यक्ती जर एखाद्या महिलेला एकट्यात भेट असे म्हणत असेल तर तो किती विकृत बुध्दीचा असेल हे लक्षात येते. तसेच यापुर्वी सुध्दा त्याचा विकृतपणा शहरवासियांना पाहला आहे. जर शाळेचा संचालक असा असेल तर शाळेतील विद्यार्थी, शिक्षकांवर काय परिणाम होतील हे चिंताजनक आहे.

किशोर काका रूपारेल यांच्यासोबत झालेला प्रकार हा पत्रकारांचा मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न असून या घटनेचा आम्ही सर्व पत्रकार बांधव जाहीर निषेध करतो. तसेच या प्रकरणातील मुख्य आरोपीसह दोषींवर आणखी कठोर गुन्हे दाखल करून त्यांना तात्काळ अटक करावी अशी मागणी करण्यात आली आहे.

निवेदन देताना खामगाव प्रेस क्लब अध्यक्ष किशोर भोसले, सचिव अनिल खोडके, अशोक जसवानी, नितेश मानकर, विकास कुलकर्णी, राहुल खंडारे, श्रीधर ढगे, योगेश हजारे, संजय वर्मा, आनंद गायगोळ, अनुप गवळी, मोहन हिवाळे, मनोज नगरनाईक, पंकज ताठे, संतोष करे, योगेश आळशी, चंद्रकांत कोचुरे, आशिष पवार, शिवाजी भोसले, महेंद्र बनसोड, मुकेश हेलोडे, मुबारक खान, अमोल गावंडे, सुनील गुळवे, गणेश पानझाडे, मंगेश तोमर, आकाश पाटील, महेश देशमुख, विनोद भोकरे, कुणाल देशपांडे, शरद देशमुख, धनंजय वाजपे, किरण मोरे, किशोर होगे, शेख सलीम शेख फरीद, नाना हिवराळे, चंद्रकांत मुंडीवाले, मिर्झा अक्रम बेग, नितीन इंगळे, सिद्धांत उंबरकर, गणेश भेरडे यांच्यासह खामगावातील व ग्रामीण भागातील पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.