कैरीची फोड यंदा नाही गोड : कैरी झाली महाग खिशाला आला राग

0

 

जळगाव | लोकशाही विशेष लेख

 

लोणचं.. हा सर्वत्र आवडीने खाल्ला जाणारा खाद्य प्रकार म्हणून ओळखला जातो.. लोकांमध्ये लोणच्याचे अनेक प्रकार प्रसिद्ध आहेत. कैरी, लिंबू, गजर, मिरची, तोंडली, भोपळा, आवळा, भोकर, गाजर आदी फळाचे देखील लोणचे जनमानसात पसंत केले जाते. विशेषतः कैरीचे लोणचं हे विशेष आवडीने खाल्ले जाणारे लोणचे आहे. पावसाची चाहूल लागण्यापूर्वीच ग्रामीण भागासह शहरी क्षेत्रात लोणचं बनवण्यासाठी महिलांची मोठी स्पर्धा सुरू झालेली दिसून येते. यासाठी बाजारपेठांमध्ये कैरी खरेदी करायला महिलांची अक्षरशः रीग लागलेली दिसून येते.

 

घरच्या लोणच्याची चवच न्यारी..

बाजारपेठेतील आयत्या लोणच्यापेक्षा घरी बनवलेल्या लोणच्याला प्राथमिकता दिली जाते. घरच्या लोणच्याची चवच न्यारी.. त्यामुळे लोणचे घरी बनवले असेल तर जेवणात अधिक रंगत येते. यंदा देखील पावसाळ्यापूर्वी लोणच्यासाठी कैरीची खरेदी करायला महिला बाजारपेठांमध्ये दिसून येत आहेत. मात्र यंदाची कैरी महाग असण्यासोबतच तिचा पुरवठा देखील बराच कमी झालेला दिसून आला.

 

 

कैरीची आवक कमी म्हणून भाव वाढले..

जळगाव शहरात असलेल्या बाजारपेठांमध्ये यंदाच्या हंगामात कैऱ्यांचे भाव वाढलेले दिसून आले आहेत. याला कारण ठरले ते म्हणजे कैऱ्यांची कमी आवक.. जळगावच्या बाजारपेठांमध्ये ग्रामीण भागातून येणाऱ्या कैरीची आवक खूपच कमी दिसून आली. चाळीसगाव, धरणगाव परिसरातून कैरी जळगावच्या बाजारपेठेत विक्रीसाठी येत आहे. मात्र यंदाचा तीव्र उन्हाळा, ढगाळ वातावरण आणि अवकाळी पावसामुळे कैरीच्या उत्पादनास सुमारे ३० टक्के घट झाल्याचे दिसून आले. त्यामुळे कैरीच्या भावात वाढ झाली. यंदा गुणवत्तेनुसार ४० ते ६० रुपये किलो दराने कैरी विकली जात असल्याचे बाजारपेठांमध्ये आढळून आले.

 

 

लोणच्याला महागाईची फोडणी..

लोणच्याला खरी चव येते ती त्याच्या बनवण्याच्या पद्धती आणि त्यात वापरलेल्या मसाल्यामुळेचं.. लोणचं बनवण्यासाठी कैरी सह बडीशेप, मिरे, मोहरी, धना पावडर, लवंग, वेलची, दालचिनी, मीठ, चटणी, गूळ, तेल, लसूण, हिंग यांसारखे मसाले वापरले जातात. कैरी कापून या सर्व मसाल्यांसह हे मिश्रण तयार करून मुरवले जाते. मात्र यंदाच्या हंगामात कैरीच्या लोणच्यासाठी लागणारे मसाले देखील महाग झालेले दिसून आले. एवढेच नव्हे तर कैरी फोडून घेण्यासाठी देखील जास्तीचे पैसे मोजावे लागत असल्याने यंदा कैरी लोणचे चांगले तिखट झालेले पाहायला मिळाले..

Leave A Reply

Your email address will not be published.