सरकारनेच ही ओबीसी आंदोलनं उभी केलीत

मनोज जरांगेंचा सरकार विरोधात मोठा आरोप

0

 

जालना | लोकशाही न्यूज नेटवर्क

राज्यात अनेक ठिकाणी ओबीसी आंदोलन सुरू झाल्यामुळे सरकार कोंडीत पकडलं गेल्याची चर्चा आहे. सरकारने मराठा समाजाला जी आश्वासनं दिली होती ती आता लांबणीवर पडू शकतात, किंवा सरकारला मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण करण्यास वेळ लागू शकतो, असं म्हटलं जात आहे. सरकारने मराठा समाजाच्या बाजूने निर्णय घेतला तर ओबीसी समाज नाराज होईल आणि ओबीसींच्या बाजूने निर्णय घेतला तर मराठा समाज नाराज होईल. कोणा एकाच्या बाजूने निर्णय घेतला तर दुसरा समाज आक्रमक आंदोलन करू शकतो. त्यामुळे सरकारसमोरील आव्हानं वाढली आहेत. यावर मनोज जरांगे यांनी प्रतिक्रिया दिली. जरांगे पाटील म्हणाले, “सरकार कोंडीत पकडलं गेलं नाही. त्यांनीच ही आंदोलनं उभी केली आहेत.”

 

“राज्यात चालू असलेली ओबीसी आंदोलनं हे सरकार पुरस्कृत आहेत”, असा आरोप मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. जरांगे पाटील हे आंतरवाली सराटी या गावात पुन्हा एकदा उपोषणाला बसले आहेत. तर आंतरवाली गावच्या वेशीवर ओबीसी समुदायातील काही लोकांनी उपोषण सुरू केलं आहे. लक्ष्मण हाके हे त्या आंदोलनाचं नेतृत्व करत आहेत. तसेच राज्यात इतर ठिकाणी देखील ओबीसींची आंदोलनं चालू आहेत. या आंदोलनावर मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जरांगे पाटील म्हणाले, “आम्ही जसे आंदोलन करत आहोत, तसाच ओबीसींना देखील आंदोलन करण्याचा अधिकार आहे. त्यामुळे आम्ही कोणाला रोखणार नाही, रोखू शकत नाही. त्यांनी त्यांचं आंदोलन करावं, आम्ही आमचं आंदोलन चालू ठेवू आणि मागण्या मांडू.”

 

 

काय म्हणाले मनोज जरांगे पाटील..!

“हे सरकार कोंडीत सापडलेलं नाही, उलट त्यांनीच ही आंदोलनं उभी केली आहेत. ही आंदोलनं सरकार पुरस्कृत आहेत. त्यामुळे ते कोंडीत पकडले गेले आहेत असं आपण म्हणू शकत नाही. ही केवळ सरकारची नाटकं आहेत. हे सरकार आम्हाला वेडे समजत आहे. सरकार आमच्या आमच्यात भांडणं लावून एका बाजूला स्वस्थ बसून पाहतंय. मुळात गावखेड्यातले ओबीसी आणि मराठा बांधव एकच आहेत. परंतु, सरकार त्यांच्यात भांडण लावून शांत बसतंय.”

 

आंदोलन करण्याचा अधिकार लोकशाहीत सर्वांनाच

जरांगे पुढे म्हणाले, “सरकार या आंदोलनाला अधिक बळ देऊ शकतं, हे आंदोलन सरकार पुरस्कृत आहे असं वाटण्याची अनेक कारणं आहेत. आंदोलन अचानक कसं काय सुरू झालं हे त्यातलं एक कारण आहे. मी भिती व्यक्त करत नाही, मी शक्यता सांगतोय. हे आंदोलन सरकार पुरस्कृत असू शकतं, अन्यथा असं अचानक घडलं नसतं. आम्हाला आमच्या हक्काचं आरक्षण मिळण्याच्या वेळीच असं कसं काय घडलं? परंतु, मी १३ जुलैपर्यंत काही बोलणार नाही. मी माझं आंदोलन चालू ठेवेन. आम्ही कोणाला आंदोलन करण्यापासून रोखू शकत नाही. तेही आम्हाला रोखू शकत नाहीत. आमच्यावर दादागिरी केली जाते ती वेगळी गोष्ट. परंतु, आम्ही कोणाला रोखणार नाही. कारण आंदोलन करण्याचा अधिकार लोकशाहीने सर्वांनाच दिला आहे.”

Leave A Reply

Your email address will not be published.