संस्कृती नव्हे तर आपला पाहण्याचा दृष्टिकोन बदललाय – रायसोनी इन्स्टिट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रीती अग्रवाल यांचे प्रतिपादन

मूळ संस्कृती सांगणे अत्यंत गरजेचे आहे - मिनू गौतम, संचालिका, राहुल मॅथेमॅटिक्स

0

 

नवरात्री विशेष जागर संस्कृतीचा

 

आपली संस्कृती नव्हे तर आपला त्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. आपण सर्व सण साजरे करत करतो पण ते सेलिब्रेट अधिक करतो. त्याचं मूळ स्वरूप जसं आहे, तसं आपण त्याला साजरे करत नाही. सर्व काही कमर्शियल झालं आहे. सांस्कृतिकता जोपासण्यापेक्षा देखावा करणं वाढलं आहे. आपण घरापासूनच याची सुरुवात करतो. घरात असो अथवा सार्वजनिक असो मूळ संस्कृती विचारात घेण्यापेक्षा आपण तिचा देखावा वाढवतो. त्यावर कितीतरी पैसे खर्च करतो, पण ही मूळ संस्कृती नाही. त्यामुळे संस्कृती आहे तशीच आहे, ती बदलली नाही. तर त्याकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन बदलला आहे, असे मत जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूटच्या संचालिका प्रा.  डॉ. प्रीती अग्रवाल यांनी मांडले.

नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने दैनिक लोकशाहीच्या कार्यालयात जागर संस्कृतीचा या विशेष मुलाखतीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी त्या बोलत होत्या.

पुढे बोलताना त्या म्हणाल्या, आपण संस्कृती पाळतो पण आपली लाइफस्टाइल फार झटपट झाली आहे. हल्लीची पिढी फार फास्ट आहे. मात्र आपण तशाही अवस्थेत पूजा, अर्चना अशा गोष्टी कमी प्रमाणात करतो. मात्र त्यासाठी इतर देखावा आणि झगमगाट अधिक करतो. आपली मूळ भारतीय संस्कृती ही सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक रित्या खूप विभिन्न आणि अर्थपूर्ण अशी आहे. मात्र तिचं खरं स्वरूप आपण विचारात घेत नाही. लहान मुलांमध्ये हे मूळ सांस्कृतिकीकरण प्रसारित होणं, ही काळाची गरज ठरली आहे. कारण मुलांचं पालन पोषण कशा पद्धतीने होतं यावर त्यांचं वर्तमान आणि भविष्य अवलंबून असतं.

मुळात आजच्या मुलांना या मूळ संस्कृती बद्दल माहित नाही. ही खरंतर आपलीच चूक आहे. कारण आपण तशा पद्धतीने त्यांना शिकवलं नाही. त्यामुळे पालक शिक्षक यांची ही संस्कृती समजावण्याची मूळ भूमिका राहील. आम्ही शैक्षणिक क्षेत्रात कार्य करतो. तिथे आम्ही सर्व प्रकारच्या विद्यार्थ्यांना बघतो. बऱ्याचशा प्रमाणात सांस्कृतिकचा जोपासली जाते, तर काही प्रमाणात तिला दुर्लक्षित देखील केलं जातं. हल्ली शासनाने २०२० न्यू एज्युकेशन पॉलिसी अंतर्गत इंडियन नॉलेज सिस्टीम सुरू केली आहे. ती अत्यंत प्रभावी अशी आहे. यात भारतीय संस्कृती प्रमाणे शिक्षण पद्धती बऱ्यापैकी अंगीकारली जात आहे. त्यामुळे संस्कृतीचे महत्त्व अधिक स्पष्ट होईल.

संस्कृती फक्त दिसायला छोटी असते. मात्र तिचे महत्त्व अत्यंत दीर्घ आणि गंभीर असं असतं. आपण एखाद्या मोठ्या मंदिरात जातो. ते मंदिर खूप अवाढव्य असतं. मात्र आत ठेवलेलं शिवलिंग हे मंदिराच्या मानाने खूप छोटं असतं. मंदिरामुळे त्या शिवलिंगाला शोभा नाही, तर शिवलिंगामुळे त्या मंदिराला शोभा असते. जर मंदिरातलं शिवलिंग काढून टाकलं तर त्या मंदिराला महत्त्व उरणार नाही. संस्कृतीचं देखील तसंच आहे. आपण आपली संस्कृती कमी लेखून चालणार नाही. तिचं महत्त्व कितीतरी मोठं असं आहे आणि हे महत्त्व समजावून देण्यासाठी शिक्षकांसोबत पालकांनी देखील आपली जबाबदारी उचलायला हवी. पालकत्वात बदल झाला तर हा बदल सहज शक्य होईल, असे मत डॉ. प्रीती अग्रवाल यांनी व्यक्त केले.

शब्दांकन

राहुल पवार

 

Leave A Reply

Your email address will not be published.