भारतीय योग परंपरा आणि विशेषता..

0

लोकशाही विशेष 

 

आजच्या आधुनिक काळात मानसिक त्रास आणि त्यासंदर्भातील विविध समस्या या दिवसेंदिवस वाढत आहे. मानसिक त्रास वाढण्याची कारणे अनेक असू शकतात शिक्षण, करीयर, नोकरी, व्यवसाय, समाजकारण, आणि राजकारण अशा विविध भूमिकेत अनेक प्रसंग असे निर्माण होतात की ज्यातून मानसिक त्रास उद्भवतो परिणामी व्यक्तीचे स्वास्थ, कार्यक्षमता आणि वागणूक यावर नकारात्मक परिणाम होतांना जाणवतो. मोबाईल, इंटरनेट, सोशल मिडीया यांचा होणारा अतिरेक देखील यास मोठ्या प्रमाणात कारणीभूत असल्याचे चित्र स्पष्ट आहे. हा तणाव फक्त पुरुषांनाच होतो असे नाही तर महिला देखील या तणावातून जातात मग त्या कार्य करणाऱ्या असो किंवा गृहिणी म्हणून यासाठीची काळजी घेणे महिला आणि पुरुष दोघांनाही महत्वाची आहे. मात्र या गोष्टी आता मानवी जीवनाचे अविभाज्य घटक झाले आहे म्हणून आता गरज आहे की या सर्वांचा सकारात्मक पद्धतीने विचार करून स्वत: चे स्वास्थ निरोगी ठेवण्यासाठी प्रयत्नशील राहण्याची याचा उत्तम आणि प्रभावी मार्ग म्हणजे ‘योग साधना’ या वर्षाचा योग दिनाचा विषय हा देखील हाच विचार घेवून ‘महिला सबलीकरणासाठी योग’  असा ठरविण्यात आला आहे.

‘योग साधना’ ही आपल्या देशाने जगाला व मानवतेला दिलेली अमूल्य भेट आहे. योग साधना ही फक्त शारीरिक आरोग्यच नव्हे, तर बौद्धिक, भावनिक, आध्यात्मिक आणि सामाजिक विकासाची गुरूकिल्ली असून याचा स्वीकार वैश्विक स्तरावर सुद्धा झालेला आपणांस दिसत आहे. याचीच प्रचीती म्हणजे संयुक्त राष्ट्र संघात देखील ‘योग’ साधनेला एकमताने स्वीकारले आहे. २१ जून हा दिवस संपूर्ण जगात जागतिक योग दिवस म्हणून साजरा केला जातो. २१ जून हा दिवस वर्षातील सर्वात मोठा दिवस आहे आणि योग साधेनेने देखील मनुष्याला दीर्घायुष्य लाभते म्हणुनच २१ जून हा दिवस जागतिक योग दिवस म्हणून साजरा केला जातो. पहिला जागतिक योग दिवस २१ जून २०१५ रोजी साजरा करण्यात आला.

प्राचीन काळापासूनच ‘योग साधना’ हा भारतीय संस्कृतीचा अभिन्न अंग आहे. योग साधनेचा विचार केला तर हिंदू धर्माचे आराध्य दैवत म्हणजेच भगवान शिव यांना पहिले योगी/आदि योगी तसेच पहले गुरू/आदि गुरू मानले जाते. पूर्व वैदिक काळ (२७०० ईसा पूर्व) काळापासून तर महर्षी पतंजली यांच्या काळापर्यंत योग साधनेच्या अस्तित्वाची साक्ष प्राप्त होते. या काळातील योग साधनेच्या अभ्यासासाठी ज्या मुख्य संदर्भाचा उपयोग होतो, यात प्रामुख्याने चार वेद, अठरा उपनिषद , स्मृति, बौद्ध धर्म, जैन धर्म, पाणिनी, महाकाव्यातील दोन उपदेश, अठरा पुराण यांचा समावेश आहे. हे संदर्भ ग्रंथ योग साधनेच्या तत्कालीन अस्तित्वाचे प्रमाण देतात, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. योग साधना आणि त्यांच्या विकासात अनेक ऋषी, मुनी, योगसाधक, योगगुरू आणि महात्मांचे योगदान आहे. महाभारत काळात देखील योगसाधनेचा उल्लेख अतिशय व्यापक स्वरूपात आढळतो. पुण्यग्रंथ ‘श्रीमद भगवद्गीता’ यात देखील ज्ञान योग, भक्ति योग आणि कर्म योग यांची संकल्‍पना अधिक विस्‍तारीत स्वरूपात मांडली आहे. अशा या मानव कल्याणकारी विद्येचा/साधनेचा आधुनिक काळात प्रसार आणि विस्तार करण्यात भारताचे पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांची भूमिका देखील महत्वाची ठरली आहे. नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदा २७ सप्टेंबर २०१४ रोजी संयुक्त राष्ट्र महासभा मध्ये दिलेल्या भाषणात योग बद्दल बोलतांना त्यांनी आपली भूमिका पुढील प्रमाणे मांडली

“योग भारत की प्राचीन परंपरा का एक अमूल्य उपहार है यह दिमाग और शरीर की एकता का प्रतीक है; मनुष्य और प्रकृति के बीच सामंजस्य है; विचार, संयम और स्फूर्ती प्रदान करने वाला है तथा स्वास्थ्य और भलाई के लिए एक समग्र दृष्टिकोण को भी प्रदान करने वाला है। यह व्यायाम के बारे में नहीं है, लेकिन अपने भीतर एकता की भावना, दुनिया और प्रकृति की खोज के विषय में है। हमारी बदलती जीवन- शैली में यह चेतना बनकर, हमें जलवायु परिवर्तन से निपटने में मदद कर सकता है। तो आइए एक अंतर्राष्ट्रीय योग दिवस को गोद लेने की दिशा में काम करते हैं।”

– नरेंद्र मोदी, संयुक्त राष्ट्र महासभा

 

यानंतर २१ जून “जागतिक योग दिवस” म्हणून घोषित करण्यात आला. ११ सप्टेंबर २०१४ रोजी संयुक्त राष्ट्रच्या १७७ सदस्य देशांव्दारे २१ जून ला “जागतिक योग दिवस’ म्हणून मान्यता देण्यात आली. प्रधानमंत्री श्री. नरेंद्र मोदी यांच्या वतीने सादर करण्यात आलेल्या या प्रस्तावास ९० दिवसाच्या आत पूर्ण बहुमताने पारित करण्यात आले असून संयुक्त राष्ट्रात सादर करण्यात आलेल्या प्रस्तावाचा सर्वात कमी अवधी आहे. आजच्या धावपळीच्या युगात संपूर्ण जगाचा विचार केला तर जवळपास बहुसंख्य व्यक्ती हे मानसिक तणाव आणि नैराश्येचा त्रासाने ग्रासलेले आहे ही बाब विविध संशोधनातून लक्षात येते. मानसिक आजाराने त्रस्त असणाऱ्या व्यक्तींचे प्रमाण सतत वाढत आहे. मानसिक त्रास दूर करण्यासाठी अनेक पद्धती विकसित झाल्या आहेत यात सर्वात सुलभ आणि परिणामकारक पद्धत म्हणून योग साधनेचा वापर केला जातो. आपणही नियमित योग करून आपले जीवन निरोगी आणि आनंदी ठेवू शकतो योग करण्याच्या अनेक पद्धती आहे. यामुळे योग साधना सुरु करतांना प्राथमिक स्तरावरून याची सुरुवात करावी. शास्त्रानुसार योग साधनाचे आठ मुख्य प्रकार सांगितले गेले आहे म्हणून योग साधनेला अष्टांग योग असे देखील म्हटले जाते. हे आठ प्रकार म्हणजे यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान तथा समाधि असे आहे. योग साधना या आठ अंगांच्या दोन वर्गांमध्ये विभागली गेली आहे. यातील पाच बहिरंग आणि शेवटचे तीन हे अंतरंग आहे. या दोन्ही प्रकारच्या साधनेला शारीरिक किंवा मानसिक तप असे देखील म्हटले जाते. तसेच योगांचे आठ पद्धती देखील आहे यांत हठ योग, विन्यास योग, अष्टांग, आयंगर, कुंडलिनी योग, बिक्रम योग, पुनर्स्थापनात्मक योग, यिन योग यातून योग साधनेच्या विविध अंगांचा अभ्यास केला जाऊ शकतो. भारतीय योग साधनेत महर्षी पतंजली द्वारा सांगितल्या गेलेल्या योगसाधनेच्या तत्वांचा वापर हा अधिक प्रमाणात केला जातो. योग साधनांचा आणि पद्धतींचा वापर करून मनुष्य आपले आरोग्य आणि जीवन निरोगी आणि उत्साही बनवू शकतो. या योग दिनाच्या आपल्या सर्वांना योगमय शुभेच्छा..

 

हितेश गोपाल ब्रिजवासी

ग्रंथपाल, विवेकानंद प्रतिष्ठान पुरस्कृत

के.ए.के.पी संस्थेचे वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, जळगाव

Leave A Reply

Your email address will not be published.