महात्मा गांधींवरुन भाजप-काँग्रेसमध्ये वाक्‌युद्ध !

0

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क 

‘ज्यांचे वैचारिक पूर्वज महात्मा गांधी यांच्या हत्येत सामील होते, ते गांधीजींनी दाखवलेल्या सत्याच्या मार्गावर कधीच चालू शकणार नाहीत’, अशा शब्दांत काँग्रेसने बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केले. “गांधी’ चित्रपटाची निर्मिती होईपर्यंत जगाला महात्मा गांधी माहीत नव्हते’, असे मोदींना एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते. त्यावरून काँग्रेसने त्यांच्यावर टीकास्त्र डागले. खोट्याने आता सामान बांधून निघायची वेळ झाली आहे, अशीही टीका मोदींवर झाली.

त्यांची सामान बांधायची वेळ झाली : काँग्रेस

‘नथुराम गोडसेसह ज्यांचे वैचारिक पूर्वज महात्मा गांधींच्या हत्येत सामील होते, ते बापूंनी दाखवलेल्या सत्याच्या मार्गावर कधीच चालणार नाहीत. खोट्याने आता सामान बांधून निघायची वेळ झाली आहे’, अशा शब्दांत काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी ‘एक्स’च्या माध्यमातून मोदींवर टीका केली. तर, ‘महात्मा गांधींबद्दल जाणून घेण्यासाठी फक्त ‘संपूर्ण राज्यशास्त्रा’च्या विद्यार्थ्याला चित्रपट पाहावा लागेल’, असे टोला काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी लगावला. काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनीही मोदींवर हल्लाबोल केला. ‘महात्मा गांधींना 1982 पूर्वी जगात ओळखले जात नव्हते असे म्हणणारे पंतप्रधान कोणत्या जगात राहतात, हे मला माहीत नाही. महात्मा गांधींचा वारसा कोणी नष्ट केला असेल तर ते या निवडणुकीनंतर पायउतार होणारे पंतप्रधान मोदी आहेत. त्यांच्याच सरकारने वाराणसी, दिल्ली आणि अहमदाबाद येथील गांधीवादी संस्था उद्ध्वस्त केल्या’, असे रमेश म्हणाले. के. सी. वेणुगोपाल, पी. चिदंबरम आदी काँग्रेस नेत्यांनीही सोशल मीडियाद्वारे मोदींवर टीका केली.

सिनेमापूर्वी गांधी जगाला माहीत नव्हते : मोदी

‘महात्मा गांधी हे महान व्यक्ती होते. मात्र, मागील 75 वर्षांत संपूर्ण जगाला त्यांची महती सांगणे ही आपली जबाबदारी नव्हती का? मला सांगायला खेद वाटतो की, त्यांच्याबद्दल कोणालाच माहिती नव्हती. ‘गांधी’ चित्रपट बनला तेव्हा ही व्यक्ती कोण याची जगभरात उत्सुकता होती’, असे मोदी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले. काँग्रेसने स्वत:च्या फायद्यासाठी गांधींचा वापर केला मात्र जनतेसमोर गांधींचे कार्य येवू दिले नाही. काँग्रेस ही स्वार्थी असल्याने ते एका महान महात्म्यापासून लांब गेले. भाजप सरकारच्या काळात महात्मा गांधींच्या नावाने अनेक योजना राबविण्यात आल्या त्यातून जनतेमध्ये गांधी हे नाव रुजविण्याचा प्रयत्न करण्यात आला असेही नरेंद्र मोदी म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.