आंतरजातीय विवाहातून दोन गटात तुफान हाणामारी

परस्पर विरोधात २९ जणांवर गुन्हा दाखल

0

 

यावल | लोकशाही न्यूज नेटवर्क 

येथे एका तरूणाने आंतरजातीय विवाह केल्याच्या कारणाने शहरात दोन गटांमध्ये तुफान हाणामारी झाल्याच्या घटनेने तणाव निर्माण झाला आहे. या प्रकरणी परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले असून गावात कडक बंदोबस्त करण्यात आला आहे.

 

सविस्तर वृत्त असे की, यावल शहरातील एका तरूणाने २४ फेब्रुवारी २०२४ रोजी दुसर्‍या एका समाजातील तरूणीशी विवाह केला होता. त्या तरूणाला मुलीच्या माहेरच्या मंडळीकडून नेहमीच धमकावण्यात येत होते. दरम्यान काल दि. २६ रोजी सकाळी साडे दहाच्या सुमारास या तरूणाला बस स्थानकाच्या समोर मुलीच्या नातेवाईकांनी बेदम मारहाण केली.

 

फायटर- चाकूने तरुणाला केले जखमी 

मारहाणीत तरुणावर बंदूक ताणून त्याला धमकाविण्यात आले तर फायटरने तसेच चाकूने मारून जखमी करण्यात आले. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. घटनास्थळी पोलीसांनी धाव घेताच हल्लेखोरांनी पळ काढला. या प्रकरणी सदर तरूणाने दिलेल्या फिर्यादीवरून मुलीच्या माहेरच्या १८ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

घटनेत ट्वीस्ट

दरम्यान, या प्रकरणात मुलीच्या माहेरच्या मंडळीच्या वतीने मुलीच्या वडलांच्या मित्राने दुसरी फिर्याद दाखल केली आहे. यात याच प्रकरणात विवाह केलेला तरूण हा मुलीच्या माहेरच्या लोकांना सातत्याने धमकावत होता असे नमूद केले आहे. सकाळी या तरूणाने अपमानास्पद बोलून आपल्या सहकार्‍यांच्या मदतीने माहेरच्या मंडळीवर हल्ला करून जखमी केल्याचे नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी सदर तरूण आणि त्याच्या सोबतच्या एकूण ११ जणांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

या हाणामारीत परस्पर विरोधी फिर्यादी दाखल करण्यात आल्या असून एकूण २९ जणांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. कोणताही अनुचीत प्रकार घडू नये म्हणून शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्त राखण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.