‘बळीराजा’ पेरणीसाठी सज्ज हो..!

मान्सूनला अनुकूल वातावरण : दहा जूनला होणार राज्यात आगमन

0

मुंबई, लोकशाही न्युज नेटवर्क 

सध्या देशासह राज्यभरातील शेतकरी वरुणराजाची आतुरतेने वाट पाहत आहेत. राज्यातील अनेक भागांमध्ये पाण्यासंदर्भात बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे राज्यातील शेतकरी चिंतेत आहे. अशातच आता भारतीय हवामान विभागाने मान्सून बद्दल दिलासा देणारी बातमी दिली आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, मान्सून दाखल होण्यास अनुकूल परिस्थिती निर्माण झाली असून, मान्सूनच्या प्रवासाने वेग घेतला आहे. ज्यामुळे पुढील पाच दिवसांमध्ये मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आगामी पाच दिवसांमध्ये केरळमध्ये मान्सून दाखल होण्यासाठीचे अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे. मान्सूनने आपल्या प्रवासाचा वेग वाढवला आहे. दरम्यान, याआधीच दि. 19 मे रोजी मान्सून अंदमान-निकोबार बेटांसह भारताच्या वेशीवर आला असल्याचे हवामान विभागाकडून जाहीर करण्यात आले आहे. हवामान विभागाने मे महिन्याच्या शेवटी नैऋत्य मान्सूनचा पाऊस केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता वर्तवली होती. त्यानुसार आता पुढील पाच दिवसांमध्ये मान्सूनचा पाऊस केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. सध्या राज्यातील विविध ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे. यंदा मान्सूनचा पाऊस सामान्य राहणार असून, सरासरीच्या 106 टक्के मान्सूनचा होईल, असे भारतीय हवामान विभागाने आपल्या प्राथमिक अंदाजात अलीकडेच म्हटले आहे. त्यानंतर आता हवामान विभागाकडून मे महिन्याच्या अखेरीस यंदाच्या मान्सूनच्या पावसाबाबतचा सुधारित आणि अंतिम अंदाज मे महिन्याच्या अखेरीस व्यक्त केला जाण्याची शक्यता आहे. जामध्ये यंदाचा पावसाळा कसा असणार? याबाबतचे अंतिम स्वरूप स्पष्ट होणार आहे.

राज्यात 10 रोजी येणार मान्सून
प्रामुख्याने, दरवर्षी मान्सून 1 जूनला केरळमध्ये दाखल होत असतो. मात्र, यावर्षी मान्सूनच्या वेगाने प्रवासासाठी काहीशी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे काही दिवस आधीच मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वेळेआधीच मान्सून महाराष्ट्रात दाखल होऊ शकतो. असा अंदाजही हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. तर 10 ते 11 जूनपर्यंत मुंबईत मान्सूनचे आगमन होण्याची शक्यता असल्याचेही हवामान विभागाने म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.