कापरेकर स्थिरांकाचे निर्माते डॉ. दत्तात्रेय कापरेकर

0

लोकशाही विशेष लेख

डॉ. दत्तात्रेय कापरेकर यांचा जन्म ठाणे जिल्ह्यातील डहाणू या गावी झाला. त्यांचे शालेय शिक्षण ठाणे येथे झाले. त्यानंतर ते पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयात पदवी शिक्षणासाठी दाखल झाले. हे एक जागतिक कीर्तीचे गणित तज्ञ होते. त्यांच्या महाविद्यालयीन काळात त्यांना गणितातले ‘रँग्लर परांजपे’ पारितोषिक मिळाले होते. १९२९ मध्ये त्यांनी मुंबई विद्यापीठाची गणित विषयातील बी.एस्सी. पदवी मिळवली. त्यानंतर कापरेकर देवळालीमध्ये शाळेत शिक्षकाचे काम करू लागले ते त्यांच्या निवृत्तीपर्यंत. नोकरीच्या काळात आणि निवृत्तीनंतरही कापरेकरांचा गणितातील आकडयांशी खेळ चालूच होता. महाविद्यालयीन स्तरावर अनेक संशोधनपर लेख प्रसिद्ध होतात, पण शालेय स्तरावर आणि शाळा मास्तरांकडून असे लेख लिहिले जाणे अतिशय अपवादात्मक असते. डॉ. कापरेकर यांचे लेख हे त्यांतले एक होते. १९७५ साली अमेरिकेतील प्रा. मार्टिन गार्डिनर यांनी कापरेकरांच्या संशोधनाची दखल घेतली आणि त्यांच्या संशोधनावर आधारित मॅथेमॅटिकल गेम्स या सदराखाली सायंटीफिक अमेरिकन या मासिकात लेख लिहिला आणि डॉ. कापरेकर भारतातच नाही तर जगभरात प्रसिद्ध झाले.

कापरेकर यांचे बहुतेक संशोधन कार्य अंकशास्त्रात आहे. १९४९ मध्ये त्यांनी ४९५ आणि ६१७४ या दोन संख्यांचा एक मजेदार गुणधर्म शोधून काढला. तोच पुढे “कापरेकर स्थिरांक” म्हणून प्रसिद्ध झाला.

कापरेकर स्थिरांक:

एक तिन्ही अंक सारखे नसलेली तीन आकडी संख्या घ्या. तिचे आकडे चढत्या आणि उतरत्या क्रमाने लिहा. येणाऱ्या संख्यांची वजाबाकी करा. असे सतत करत रहा शेवटी ४९५ ही संख्या येईल.
उदा. ९४२-२४९=६३९; ९६३-३६९=५९४ ; ९५४-४५९=४९५.
कुठलीही चार अंकी संख्या घ्या. (या संख्येत कमीत कमी दोन तरी वेगळे अंक असावेत. सुरुवातीचे दोन्ही अंक शून्य चालतील). या संख्येतील अंक एकदा चढत्या क्रमाने आणि एकदा उतरत्या क्रमाने लावून दोन संख्या तयार करा. (उतरत्या क्रमाने बनणारी संख्या चार अंकापेक्षा लहान असेल तर सुरुवातीला शून्य जोडून ती संख्या चार अंकी करा). मिळणाऱ्या मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करा. असे सतत करत रहा शेवटी ६१७४ ही संख्या येईल.
उदा. ५४३२–२३४५=३०८७; ८७३०–०३७८=८३५२; ८५३२–२३५८=६१७४; ७६४१–१४६७=६१७४

कु. गायत्री अशोक शिंदे
केसीई बी.एड. कॉलेज
जळगाव

Leave A Reply

Your email address will not be published.