दीक्षाभूमी अंडरग्राऊंड पार्किंग तोडफोड प्रकरणी १२५ जणांवर गुन्हे दाखल

आरोपींचा नावाची गुप्तता : परिसरातील शाळांना दिली सुट्टी

0

 

नागपूर

 

नागपुरातील दीक्षाभूमी अंडरग्राऊंड पार्किंगला विरोध करत आंबेडकरी अनुयायांनी सोमवारी जोरदार आंदोलन केले होते. यावेळी आंदोलकांनी अंडरग्राऊंड पार्किंगच्या कामासाठी वापरण्यात येणाऱ्या साहित्यांची तोडफोड केली होती. याप्रकरणी नागपूर पोलिसांनी कारवाई करण्यास सुरुवात केली असून पोलिसांनी याप्रकरणी १२५ पेक्षा अधिक जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

 

पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरु झाला आहे. याप्रकरणी वंचित बहुजन आघाडीशी संबंधित असलेल्या रवी शेंडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गैर कायद्याची मंडळी जमवून आंदोलन, जाळपोळ केल्याप्रकरणी आणि ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आंदोलकांविरोधात हे गुन्हे नागपूरच्या बजाजनगर पोलिस ठाण्यामध्ये दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये १५ आंदोलकांची ओळख पटलेली आहे. पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

 

आरोपींच्या नावाची गुप्तता

आरोपी आंदोलकांच्या नावाबाबत पोलिसांनी अतिशय गुप्तता पाळली आहे. पुन्हा आंदोलनाचा भडका उडू नये यासाठी पोलिसांकडून गुप्तता पाळण्यात आली आहे. यात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलिस बंदोबस्त दीक्षाभूमी परिसरात तैनात करण्यात आला आहे. गुन्हे दाखल करण्यात आलेल्या १५ लोकांची प्राथमिक ओळख पटली आहे. यासह अज्ञात मध्ये ११० च्या वर आंदोलकांचे नाव आहे. यात नागपूरबाहेरील जिल्ह्यातील सुद्धा काही जणांची नाव असून पोलिस त्यांची ओळख पटवण्याचे काम करत आहे. पोलिस याबाबत कुठेही नाव पुढे करत नसून कमालीची गुपत्ता पाळत आहेत.

 

परिसरातील शाळांना सुट्टी

दरम्यान या मार्गावर असलेल्या शाळांना काल सुट्टी जाहीर करण्यात आली होती. आजही शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. नागपुरातील दीक्षाभूमी परिसरातील कुर्वेज मॅाडेल स्कूल या शाळेला सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. दीक्षाभूमी परिसरात काल ट्राफिक जामची मोठी समस्या निर्माण झाली होती. याशिवाय कायदा आणि सुव्यस्था निर्माण होऊ नये म्हणून मोठा पोलिस बंदोबस्त दीक्षाभूमी परिसरात तैनात करण्यात आला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी कुर्वेज मॅाडेल स्कूल आज देखील बंद ठेवण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.