खासदाराच्या मुलीने युवकाला चिरडले; मात्र काही वेळातच मिळाला जामीन

0

 

चेन्नई | लोकशाही न्यूज नेटवर्क

चेन्नईमध्ये पुन्हा पुण्यातील पोर्श कार अपघाता सारखा प्रकार उघडकीस आला आहे. बेधुंदपणे वाहन चालवून एका व्यक्तीला चिरडण्याचा हा प्रकार सोमवारी (१७ जून) घडला आहे. वायएसआर काँग्रेसचे राज्यसभा खासदार असलेल्या बीडा मस्तान राव यांच्या मुलीने महागड्या बीएमडब्लू कारने पथपथावर झोपलेल्या एका युवकाला चिरडले.

 

मृत युवकाचे नाव सूर्या (वय २१) असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. सूर्या पेंटरचे काम करायचा. अपघाताच्या दिवशी तो मद्यधुंद अवस्थेत पदपथावरच झोपला असल्याची माहिती स्थानिकांनी दिली. या अपघातानंतर खासदारांची मुलगी माधुरी रावला अटक करण्यात आली होती. मात्र काही वेळाने तिला जामीन देण्यात आला.

 

पुण्यातील कल्याणीनगर भागात पोर्श कारच्या अपघाताला एक महिनाही अद्याप उलटलेला नाही, तोच महाराष्ट्रासह अन्य राज्यातही अशाच प्रकारच्या घटन समोर येत आहेत. चेन्नईतही असाच प्रकार समोर आला आहे. चेन्नई पोलिसांनी या प्रकरणाची माहिती देताना सांगितले की, मृत युवक सूर्या सोमवारी रात्री चेन्नईच्या एका पदपथावर झोपला होता. यावेळी भरधाव बीएमड्ब्लू कारने सूर्याला चिरडले. गंभीर दुखापत झाल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. अपघातावेळी माधुरी राव गाडी चालवत होती, तर तिच्यासह आणखी एक महिला होता. अपघात होताच दोघींनीही घटनास्थळावरून पळ काढला.

 

ट्राफिक पोलीस तपास विभागाने भारतीय दंड विधान कायद्याच्या कलम ३०४ अ (निष्काळजीपणामुळे एखाद्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरणे) नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुण्यातील प्रकरणात हेच कलम सुरुवातीला लावण्यात आले होते. हे कलम जामीनपात्र असल्यामुळे माधुरी रावला जामीन मिळणे सोपे झाले. पोलिसांनी कारच्या मालकालाही नोटीस पाठविली आहे.

 

स्थानिकांनी सूर्याला रुग्णालयात हलविले, मात्र जबर जखम झाल्यामुळे त्याचा मृत्यू झाला. मृत सूर्याचे आठ महिन्यांपूर्वीच लग्न झाले होते. त्याच्या निधनाचे वृत्त समजताच जे-५ शास्त्री नगर पोलीस ठाण्यात नातेवाईकांनी धाव घेतली आणि न्याय मागण्याची मागणी केली. अपघात झाल्यानंतर माधुरी रावने घटनास्थळावरून तात्काळ पळ काढला. तर तिच्या मैत्रिणीने तिथे जमलेल्या स्थानिकांशी सुरुवातीला वाद घातला. मात्र वाद वाढताच तिनेही घटनास्थळावरून काढता पाय घेतला.

 

पोलिसांच्या प्राथमिक तपासात सदर बीएमडब्लू कारची नोंदणी पुद्दूचेरी येथे केलेली असून कार  खासदार बीडा मस्तान राव यांच्या बीएमआर या उद्योग समूहाची असल्याचे समोर आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.