खामगाव नगर पालिका म्हणजे नुसता टाईमपास, नया है वह म्हणून मुख्याधिकार्‍यांची खिल्ली

0

खामगाव (गणेश भेरडे) : खामगाव नगर परिषदेची उद्या 30 एप्रिल रोजी सर्वसाधारण सभा बोलाविण्यात आली आहे. यामध्ये 29 विषयांवर विचार विनिमय करून निर्णय घेण्यात येणार आहे. त्यामध्ये विषय क्र. 24 नटराज गार्डन विकसित करणे या विकास कामाच्या मंजुर नकाशा बदलाप्रमाणे अंदाजपत्रक सुधारित करणेबाबत विचार विनिमय करून निर्णय घेण्यात येणार आहे.

दरम्यान नागरिकांनी आतापर्यंत नगरपालिकेकडे केलल्या विकास कामांविषयीच्या तक्रारी तसेच न.प. जागेवरील अतिक्रमण, अवैध नळ कनेक्शन याशिवाय नागरिकांच्या इतर समस्यांकडे लक्ष देण्यास न.प. मुख्याधिकारी मनोहरराव अकोटकर यांना वेळ नाही, मात्र रूजू झाल्यापासून ठेकेदारांच्या हिताबरोबरच स्वहित कसे साधता येईल, याकडेच जास्त लक्ष असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे खामगाव नगर पालिका सर्वसामान्यांसाठी नुसता टाईमपास झाली असून नया है वह असे म्हणून मुख्याधिकार्‍यांची खिल्ली उडविली जात असल्याचे दिसून येत आहे.

मागील दीड वर्षापूर्वी सुमारे दीड कोटी खर्चाचे मंजूर झालेले नटराज गार्डनच्या सुशोभिकरणाचे काम ठेकेदारांच्या मनमानी कारभारामुळे रखडले आहे. सुशोभीकरणाचे काम सन 2019 मध्ये सुरू करण्यात आले होते. परंतु संबंधित ठेकेदाराने मंजुर नकाशाऐवजी वेळोवेळी नकाशा बदलवून  उद्यानात मनमानी बांधकाम सुरू केले होते.या कामापोटी संबंधित ठेकेदाराला लाखोची  रक्कमही अदा करण्यात आल्याचे समजते. दरम्यान याबाबत झालेल्या तक्रारीमुळे जिल्हाधिकारी यांनी सदर काम थांबविण्याचे आदेश दिले होते. मिळालेल्या माहितीनुसार आता उद्या न.प.च्या सर्वसाधारण सभेत नगर रचना विभागाच्या बदलानुसार नटराज गार्डनचा चौथा नकाशा सुधारित अंदाजपत्रकासह मंजुर होण्याचे संकेत मिळत आहे. त्यामुळे या विकास कामावर आतापर्यंत झालेल्या खर्चाचे काय? याबाबतही विचार विनिमय होणे गरजेचे आहे. सोबतच याबाबीला कारणीभूत असलेले नगर अभियंता यांना जबाबदार धरण्यात यावे, असेही काही ठेकेदार खाजगीत बोलत आहेत.

मुख्याधिकारी अकोटकर यांची टिप्पणी- 13 व्या वित्त आयोगा अंतर्गत नटराज गार्डन विकसित करण्याचे काम  प्रस्तावित करण्यात आलेले होते. संबंधित ठेकेदार यांना कार्यारंभ आदेश दिलेले असता त्यांनी जागेवर जाऊन कामास सुरूवात केलेली असता प्रत्यक्ष काम करतेवळी जागेची भौगोलिक स्थिती लक्षात घेऊन मंजूर संकल्पचित्र यांचेशी सांगड जुळत नसल्याने सदर नकाशास पुन्हा नगर रचना विभागाकडून मंजुरी घेणे क्रमप्राप्त असल्याचे नगर अभियंता यांनी निदर्शनास आणून दिलेले आहे. त्याप्रमाणे सुधारित नकाशास मा. सहायक संचालक नगर रचना बुलढाणा यांचे पत्रानुसार सुधारित अंदाजपत्रक तयार करून त्यास समुचित प्राधिकरण यांच्याकडून तांत्रिक मंजुरी घेणे आवश्यक आहे. सदर बदलासाठी व अंदाजपत्रक सुधारित करण्याकरिता प्रकरण सर्वसाधारण सभेसमोर ठेवण्याची शिफारस करण्यात येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.