गुड न्यूज : रुग्ण बरे होण्याच्या बाबतीत भारत जगात पहिल्या क्रमांकावर

0

नवी दिल्ली : जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. या व्हायरसमुळे जगभरात ९ लाखाहून अधिक जणांचा बळी गेला असून जवळपास ३ कोटी लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. दरम्यानं, सर्वाधिक करोनाबाधित रुग्ण बरे होण्याच्या बाबतीत भारत जगात पहिल्या क्रमांकावर आला असून, ब्राझीलपेक्षा भारतात बरे झालेले रुग्ण अधिक आहेत. जॉन हॉपकिन्स विद्यापीठाच्या सोमवार सकाळपर्यंतच्या आकडेवारीनुसार भारतात ३७ लाख ८० हजार १०७ करोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत.

या आकडेवारीनुसार जगभरात १ कोटी ९६ लाख २५ हजार ९५९ लोक करोनातून बरे झाले आहेत, तर जगातील करोनाबाधितांची संख्या २ कोटी ९० लाख ६ हजार ३३ इतकी झाली आहे. जगभरात करोनामुळे ९ लाख २४ हजार १०५ मृत्यू झाले आहेत. जॉन हॉपकिन्स विद्यापीठ कोव्हिड-१९ आजाराशी संबंधित जगभरातील माहिती एकत्र करीत असते. या विद्यापीठाच्या आकडेवारीनुसार करोनातून बरे झालेल्या रुग्णांच्या बाबतीत भारत जगात पहिल्या क्रमांकावर आला आहे. भारतात ३७ लाख ८० हजार १०७ करोनाबाधित बरे झाले असून, ब्राझीलमध्ये ३७ लाख २३ हजार २०६ जण बरे झाले आहेत. अमेरिकेत २४ लाख ५१ हजार ४०६ रुग्ण बरे झाले आहेत.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, भारतातील रुग्ण बरे होण्याचा दर ७८ टक्के आहे. देशात दररोज मोठ्या संख्येने रुग्ण करोनातून बरे होत आहेत. ‘गेल्या २४ तासांत ७७ हजार ५१२ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. देशात बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३७ लाख ८० हजार १०७ इतकी आहे. बरे झालेले रुग्ण आणि सक्रिय रुग्ण यांच्यातील फरक सातत्याने कमी होत आहे,’ असे आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. देशातील बरे झालेल्या रुग्णांपैकी महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, तसेच तमिळनाडू या राज्यांतील रुग्ण ६० टक्के आहेत. देशातील सक्रिय रुग्णसंख्या ९ लाख ८६ हजार ५९८ असून, देशातील करोनाबाधितांची एकूण संख्या ४८ लाख ४६ हजार ४२७ इतकी झाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.