स्थायीसभेत थकबाकीच्या मुद्यावरुन सेना-भाजपात जुंपली!

0

जळगाव दि. 5-महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या सभेत थकबाकी कोणाची? या मुद्यावरुन सत्ताधारी भाजप व शिवसेनेची चांगलीच जुंपली. मात्र युती बरोबर सत्तेत असलेले व भाजपासोबतही सत्तेत असलेल्या नगरसेवक सदाशिव ढेकळे यांच्या मध्यस्थीने वादावर पडदा पडला.
महानगरपालिकेच्या स्थायी समितीची सभा दि. 5 मंगळवारी प्रशासकीय इमारतीच्या 2र्‍या मजल्यावरील सभागृहात दुपारी 1 वा. सभापती जितेंद्र मराठे यांच्या अध्यक्षतेत आयोजित करण्यात आली होती. यावेळी व्यासपीठावर स्थायी समिती सभापती जितेंद्र मराठे, आयुक्त चंद्रकांत डांगे, अपर आयुक्त चंद्रकांत खोसे, नगरसचिव सुभाष मराठे यांची उपस्थिती होती. सदर सभेत भटक्या व मोकाट कुत्र्यांचे निर्बीजीकरण व रॅबीज प्रतिबंधक लस देणे व संस्थेच्या कामावर नियंत्रणासाठी कंत्राटी तत्वावर पशुवैद्यकीय अधिकार्‍याची नेमणूक करणे, जीइएम पोर्टलवरुन 2 नगर वॉटर टँकर खरेदीसाठी 32 लाख 57 हजार 800 रुपयांच्या किमतीस मान्यतेसह, 2017-18 च्या लेख्यास मंजुरी, लेखा परिक्षकाच्या अहवालाची माहिती आदीसह 6 प्रशासकीय प्रस्तावांना मान्यता देण्यात आली.
आर्थिक लेखा हा मनपाचा आरसा- नितीन लढ्ढा
सन 2017-18 या आर्थिक वर्षाच्या लेख्यास मंजुरी देण्याचा विषय समोर आला. त्यावेळेस तरतुदीप्रमाणे खर्च नसल्याची बाब माहिती सादर करायला हवी होती, असे मत नगरसेवक सदाशिव ढेकळे यांनी मांडले. त्यावेळी शिवसेनेचे नितीन लढ्ढा यांनी महाराष्ट्र अधिनियम -94 नुसार एप्रिल महिन्यात तपशीलवार अहवाल सादर करायला हवा होता. आज 11 महिन्यांच्या कालावधी होवूनही अहवाल येत नसेल तर प्रशासन किती गंभीर आहे? याचा प्रत्यय येतो. हा विषय हसण्यावरी न नेता गांभीर्य ओळखा असे आयुक्तांना सुनावले. आर्थिक लेखा हा मनपाचा आरसा आहे. महानगरपालिकेची 26 कोटी, 52 लाख 22 हजार 311 रुपयांची वसुली थकीत आहे. तर वसुली केवळ 1 कोटी 84 लाख 536 रुपयांची झाली आहे. म्हणजे 69टक्के वसुली बाकी असेल तर मनपा चालविणे कठीण होईल. यापेक्षा धर्मदाय आयुक्तांकडे मनपा चालवायला दिली पाहिजे, असा रोष नितीन लढढा यांनी सत्ताधार्‍यांवर प्रकट केल्यानंतर सभापती जितेंद्र मराठे यांनी वर्षानुवर्षे सत्ता कोणाची होती? या परिस्थितीला जबाबदार कोण? असा प्रतिप्रश्न विचारल्यावर भाजपा व शिवसेना आक्रमक झाले. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप होत असताना नगरसेवक सदाशिव ढेकळे यांनी मी युतीसोबत सत्तेत असताना भाजपावाले हाच प्रश्न विचारत होते. थकबाकी पुर्वीपासून आहे राग मानू नका आपणास प्लॉटधारक कोण आहे ते माहित नाही सर्वे करा नोटीस देवून वसुली करु असे आयुक्तांनी सुचविले. हा प्रश्न आयुक्त, सभापतींचा नाही आपणा सर्वांचा आहे. सर्वांनी लक्ष घालून पाठपुरावा केला पाहिजे. मागच्या बॉडीनेही लक्ष घालायला हवे. आम्हाला केवळ सहा महिनेच झाले आहेत, असे सभापती मराठेंनी स्पष्ट केले. आरोप म्हणून आम्ही बोलत नसून वसुली कशी करायची हे प्रशासनाचे काम आहे. मनपाचा खर्च अमाप मात्र वसुली नाही,असे नितीन लढ्ढा यांनी स्पष्ट केल्यावर वादावर पडला पडला.
इतिवृत्त म्हणजे काय?
इतिवृत्तात मागील सभेचा वृत्तांत, त्यातील मंजुरी याची तपशीलवार माहिती सादर करण्यात यावी याबाबत सभेच्या सुरुवातीला इतिवृत्ताचा अर्थ समजावून सांगत ते कशा पद्धतीने सादर केले पाहिजे, याबाबत नितीन लढ्ढा यांनी प्रशासनाचे प्रबोधन केले.
4थ्या स्थायीच्या सभेतही वाहने नादुरुस्त
जेईएम पोर्टलवरुन 2 नग वाटर टँकर खरेदीस 32 लाख 57 हजार 800 च्या खरेदीस मंजूरी देण्यात आली. त्यावेळी नितीन लढ्ढा यांनी गेल्या चार स्थायीच्या सभेत पाठपुरावा करुनही मनपाची वाहने नादुरुस्त असल्याचा मुद्दा उपस्थित केला. वाहने दुरुस्तीला सभापती व आयुक्तांनी आदेश दिले होते. टायरअभावी वाहने नादुरुस्त असल्यामुळे सर्वाजनिक शौचालयांना पाणीपुरवठा नाही. सध्या स्वच्छ भारत अभियान चालू आहे. शौचालयांना पाणी नसेल तर अभियानाचा बोजवारा उडेल असे सुचित केले. याबाबत आयुक्तांनी आरोग्य विभागाला विचारणा केली असता विभागाकडे शंभर वाहने असल्याने आता निश्चित सांगता येणार नाही असे आरोग्याधिकारी उदय पाटील यांनी सांगितले. टायरमुळे वाहने बंद नसल्याचे व टायरची मागणी आजच केली आहे, आयुक्तांनीच स्पष्ट केले. टायर फुटून दुर्घटना झाल्यास जबाबदार कोण? असा मुद्दा नितीन लढ्ढा यांनी उपस्थित केला. यावर मनपा कर्मचारी भोळे यांच्याकडे अनेक विभागाचे चार्ज असल्याची माहिती नगरसेवक सुनिल खडके यांनी दिली.
6 टँकर मात्र भरण्याची दुरावस्था- नितीन बरडे
महानगरपालिकेकडे 6 पाण्याचे टँकर आहेत. टँकर भरण्याची व्यवस्था दोनच ठिकाणी असून त्यातील मेहरुण येथील विहिरीची दुरावस्था आहे. तेथील स्वीच तुटलेले आहे. मुले त्या विहिरीत उड्या मारतात. विहिरीत काळे पाणी आहे. दुरावस्थेमुळे एखादा कर्मचारी दगावेल. तेथील दुरुस्तीसह ब्लिचिंग करायला हवे, असे बरडे यांनी सुचविले.
वाघूर धरणातून पाण्याची चोरी
वाघूर धरणातून पाण्याची चोरी होत आहे. शहरात अनेक ठिकाणी पाईपलाईनला गळत्या लागल्या आहेत. त्यांच्या नियोजनाअभावी पाणी वाहून जाईल. हिवाळ्याच्या चार महिन्यात 18 टक्के पाणी कमी झाले आहे. उन्हाळ्यात पाणीसमस्येला सामोरे जावे लागणार आहे. प्रशासनाने गांभीर्य लक्षात घेवून धडक मोहिम राबवून नियोजन करावे, अशा सूचना नितीन लढ्ढा यांनी केल्या.
सुकदेवराव यादव टाकी का चालू नाही?
शहरातील गिरणानदीवरील सुकदेवराव यादव पाण्याची टाकी गेल्या अनेक वर्षांपासून बंद आहे. याबाबत नितीन बरडे यांनी आयुक्तांना विचारल्यावर याबाबत सभापतींना विचारणा करावी,असे आयुक्तांनी सुचविले.
मुलांना खाऊन देण्यासारखी वाईट स्थिती आहे का?
26 जानेवारी व 15 ऑगस्टला मुलांना खाऊ वाटप केला होताका? काय वाटप केले होते? काय वाटप केले होते? आदी प्रश्न नगरसेविका उज्ज्वला बेंडाळे यांनी प्रशासनाला विचारुन 26 जानेवारी रोजी केवळ 2रु किंमतीची बिस्किटाचे पुडे वाटण्यात आल्याची माहिती सभागृहाला देत इतकी वाईट स्थिती आहे का? अशी विचारणा प्रशासनाला करत पुढच्या वेळी लक्षात ठेवा अशी सूचना केली. तर सभागृहाला चहा पाजणार्‍या चहावाल्याचेही बील पेंडींग असल्याची माहिती नितीन लढ्ढा यांनी दिली.पदाधिकारी व अधिकार्‍यांत समन्वय नाही दबाव आणला जातो. या आरोपाबाबत वस्तुस्थिती समजून घेण्याची गरज असल्याचे भगत बालाणी यांनी सुचविले.
शिवाजीनगर पुल पडला तर बैलगाड्यांचे काय?
शिवाजीनगर पुलावरुन अनेक बैलगाड्याधारक शेतकरी बांधव ये-जा करतात. पुल पाडल्यानंतर बैलगाडया कोठून जातील. ममुराबाद पुलाचे काम ठप्प आहे त्यामुळे पर्यायी रस्ता नाही. त्यावेळी रेतीचा प्रश्न असल्याने बांधकाम रखडले आहे, अशी माहिती आयुक्तांनी दिली. बैलगाड्यांसाठी असोद्याचा पर्यायी रस्ता उपलब्ध करुन देवू. पर्यायी रस्त्यावरील अतिक्रमण हटविण्यात येईल,असा इशारा आयुक्तांनी दिला.

Leave A Reply

Your email address will not be published.