सार्वजनिक आरोग्य खात्यातील चतु्र्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांना मंजूरी

0

दोन महिन्यांत पूर्ण कार्यवाही; संघटनेचे नेते भाऊसाहेब पठाण यांची माहिती
पाचोरा (प्रतिनिधी) : राज्यातील सार्वजनिक आरोग्य खात्यांतर्गत असलेली रुग्णालये तसेच कार्यालयातील गट – “ड” चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या मागण्या मंजूर करण्यात आल्या असुन येत्या दोन महिन्यांत त्यांच्यावर पूर्ण कार्यवाही होईल, अशी माहिती राज्य सरकारी गट – “ड” (चतुर्थश्रेणी) कर्मचारी मध्यवर्ती महासंघाचे अध्यक्ष भाऊसाहेब पठाण यांनी दिली.

संघटनेच्या वतीने आरोग्य सेवा विभागाच्या संचालिका डॉ. अर्चना पाटील यांना यापूर्वी निवेदन दिले होते. तसेच आरोग्यमंत्री राजेश टोपे पुणे दौऱ्यावर असतांना उपसंचालक संजय देशमुख यांच्या उपस्थितीत कार्यालयातील संबंधित पदाधिकाऱ्यांसमवेत त्यांची चर्चा झाली. यावेळी झालेल्या सकारात्मक चर्चेत या मागण्या मंजूर केल्या गेल्या. त्यानुसार सार्वजनिक आरोग्य विभागातील चतुर्थश्रेणी वर्गातील सर्व रिक्त पदे सरळसेवेने तीन महिन्यात १०० टक्के भरणे, अनुकंपा वारसा हक्काची संपूर्ण राज्यातील रिक्त पदे दोन महिन्यात भरणे, वर्ग – ४ मधून वर्ग – ३ मध्ये पदोन्नतीने होणाऱ्या अंतर्गत पदोन्नत्या पात्रतेनुसार दोन महिन्यात भरणे, सातव्या वेतन आयोगानुसार १०:२०:३० वर्षाच्या आश्वासित प्रगती योजनेचे लाभ एक महिन्यात देणे, औरंगाबाद विभागातील खास करून हिंगोली जिल्ह्यामध्ये कर्मचाऱ्यांची वर्षानुवर्षे अपूर्ण असलेली भविष्य निर्वाह निधी खाते पुस्तके, सेवा पुस्तके, इतर प्रलंबित असलेल्या प्रकरणाचा निपटरा करण्यासाठी तात्काळ समिती नेमून त्यांच्या अहवालानुसार दोषी अधिकारी व कर्मचारी यांच्यावर त्वरित कारवाई करणे, चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या अडीअडचणींबाबत दर दोन महिन्यांनी महासंघाच्या स्थानिक जिल्हा शाखा पदाधिकाऱ्यां समवेत चर्चा करून प्रश्न सोडविण्याबाबत लेखी आदेश सर्व सिव्हिल सर्जन यांना देणे, चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना विशेष बाब म्हणून जोखीम भत्ता देण्याबाबत शासनाकडे प्रयत्न करणे, या मागण्यांबाबत चर्चा होऊन त्याला मान्यता दिली गेली.

यावेळी चर्चेत महासंघाचे अध्यक्ष भाऊसाहेब पठाण, महासंघाच्या राज्य महिला उपाध्यक्षा तसेच सार्वजनिक आरोग्य विभाग चतुर्थश्रेणी कर्मचारी संघटनेच्या अध्यक्षा सुरेखा चव्हाण, महासंघाचे मुख्य राज्य संघटक प्रकाश घाडगे, पुणे विभागीय उपाध्यक्ष दिनेश कुचेकर, पुणे विभागीय महिला उपाध्यक्षा संध्या काजळे, पुणे जिल्हा सचिव बाबा खान, सार्वजनिक आरोग्य विभाग चतुर्थश्रेणी कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस राजन राऊत, राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे पुणे जिल्हा अध्यक्ष व विभागीय उपाध्यक्ष मारूती शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.