संजय राठोडांच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या भाजप महिलांना अटक व सुटका

0

जळगाव, प्रतिनिधी । पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण उघडकीस आल्यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठे वादळ उठले आहे. या प्रकरणात शिवसेनेचे नेते व राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांचे नाव समोर आल्याने  विरोधी पक्षांनी या प्रकरणाच्या चौकशीची मागणीही केली होती. तसेच संजय राठोड यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी केली होती.

 

दरम्यान,  संजय राठोड यांच्या विरोधात आज शनिवारी भाजपा जळगाव महानगर जिल्हा महिला आघाडीतर्फे  चक्का जाम आंदोलन पुकारण्यात आले होते. मात्र, पोलिसांनी आंदोलकांना लागलीच ताब्यात घेऊन त्यांची सुटका केली.

 

आकाशवाणी चौकात आज भाजप महिला आघाडीतर्फे चक्का जाम आंदोलन करण्यात येणार होते. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. आंदोलक येण्यापुर्वीच महिला पोलीस देखील दाखल झाल्या होत्या. भाजपच्या महिला पदाधिकारी व कार्यकर्ते हे एक एक करून आकाशवाणी चौकात ११ वाजेच्या सुमारास एकत्र आले. मात्र, या सर्वांनी जेव्हा चौकात जाण्याचा प्रयत्न केला तेव्हा पोलिसांनी त्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी जमावबंदी आदेश लागू केलेले असल्याने  अटकाव केला. या सर्वाना पोलीस व्हॅनमध्ये बसवून जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला नेण्यात आले. जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला गेल्यावर या पदाधिकाऱ्यांनी त्यांनी आंदोलन केले नसल्याने त्यांच्यावर गुन्हे दाखल करू नये असा पवित्रा घेतला. यावेळी तेथे महानगर अध्यक्ष दिपक सुर्यवंशी व जेष्ठ नगरसेवक कैलास सोनवणे देखील दाखल झाले. त्यांनी देखील गुन्हा दाखल करणे चुकीचे असल्याची भूमिका घेतली.  आंदोलकांना  कलम १६६ प्रमाणे अटक व सुटका करण्यात आली. याबाबतची भूमिका पत्रकार परिषदेत जाहीर करू असे या पदाधिकाऱ्यांनी  सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.