शेतकऱ्यांच्या पांढऱ्या सोन्यावरील कोरोनाचे संकट दूर होणार ; खा. रक्षा खडसेंच्या पाठपुराव्याला यश

0

जळगाव : शेतकऱ्यांनी वर्षभर मेहनत घेऊन कापसाचे उत्पादन काढले. परतीच्या पावसामुळे यावर्षी कापसाचे पीक उशिरा हातात आले. त्यामुळे शेतकऱ्यांना कापूसविक्रीसाठी उशीर झाला.

जगात कोरोना विषाणूंचे थैमान सुरू झाले, दिवसेंदिवस रुग्ण संख्येमध्ये वाढ होत असल्याने देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी 21 दिवसाचा लॉकडाउन घोषित केला. लॉकडाउन 14 एप्रिल पर्यंत उघडेल अशी आशा शेतकऱ्यांना होती परंतु 3 मे पर्यंत लॉकडाउन सुरू राहणार आहे. संपूर्ण परिस्थिती पाहता लॉकडाउन आणखी वाढवण्याची शक्यता नाकारता येत नाही.

या पार्श्वभूमीवर खासदार रक्षाताई खडसे यांनी 15 एप्रिल रोजी सीसीआय भारतीय कापूस महामंडळ च्या अधिकाऱ्यांना सदर परिस्थिती बाबत चर्चा केली होती.

शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी (सीसीआय) भारतीय कापूस महामंडळाने त्यावेळी आठवडाभरात कापूस खरेदी केंद्रे सुरू करण्याचे आश्वासन दिले होते, परंतु जळगाव जिल्ह्यात कोरोना रोगाचे रुग्णांची संख्या वाढल्याने कापूस साठा करून ठेवण्यासाठी मजूरांची टंचाई भासत होती. त्यामुळे आतापर्यंत सीसीआय मार्फत कापूस खरेदी सुरू झाली नव्हती.

या कारणामुळे शेतकरी हवालदिल झाले होते. याबाबत खासदार रक्षाताईंचा दररोज पाठपुरावा सुरू होता. या पाठपुराव्याला यश मिळून मंगळवार 5 मे पासून सीसीआय मार्फत कापूस खरेदी केंद्रे सुरू होतील अशी माहिती खासदार रक्षाताई खडसे यांनी दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.