वराडसीमची चारशे वर्षांची परंपरा खंडीत; बैलपोळयाची शर्यत यंदा नाही

0

वराडसीम, ता. भुसावळ : येथील पोळ्याला ऐतिहासिक परंपरा लाभलेली आहे. तालुक्यासह परिसरातून नागरिक या ठिकाणी बैलांच्या शर्यती पाहण्यासाठी मोठ्या संख्येने येत असतात. यात पुरातन गावदरवाजातून बैलांना कुदवून शर्यत लावली जाते. मात्र,यंदा सर्वत्र कोरोनाचे सावट असून, होणारी गर्दी टाळण्यासाठी पोलिस प्रशासनातर्फे कुठेही गर्दी न करता, केवळ घरोघरीच बैलांचे पूजन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यामुळे तब्बल चारशे वर्षांची परंपरा यंदा खंडित झाल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी दिसून येत आहे.

पोळा म्हणजे बळीराजाचा महत्त्वाचा दिवस. सखा, मित्र सर्जा-राजासाठी पोळ्याचा  दिवस मानाचा असतो. हा सण ग्रामीण भागात ठिकठिकाणी उत्साहात साजरा केला जातो. वराडसीम येथील पोळ्याला ऐतिहासिक परंपरा लाभलेली आहे. तालुक्यासह परिसरातून नागरिक या ठिकाणी बैलांच्या शर्यती पाहण्यासाठी येत असतात. त्यामुळे गावाला एक प्रकारे यात्रेचे स्वरूप प्राप्त होते. यात पुरातन गावदरवाजातून बैलांना कुदवून शर्यत लावली जाते.

सुमारे चारशे वर्षांपूर्वी (स्व.) नारायण राघो पाटील यांनी गावाच्या सुरक्षेसाठी हा दरवाजा बनविला आहे. त्या काळी केवळ २५ रुपये खर्च दरवाजा बनविण्यासाठी आला आहे. या ठिकाणी एक बंगलादेखील उभारण्यात आला असून, त्या वेळी गावात कोणीही प्रवेश केला तरी त्याची प्रथम खिडकीमधून चौकशी करण्यात येत होती. त्यानंतरच त्याला खिडकीद्वारे प्रवेश देण्यात येत होता. कालांतराने दरवाजा उघडा करण्यात आला. मात्र, केवळ पोळ्याच्या दिवशी हा दरवाजा बंद करून व खिडकी उघडून बैलपोळा फोडण्याची परंपरा सुरू करण्यात आली. ती परंपरा अद्यापही सुरू आहे. पोळ्याच्या दिवशी मानाच्या बैलास गावदरवाजाच्या अडीच बाय तीन फुटांच्या खिडकीतून उडी घेऊन पोळा फोडण्याचा मान दिला जातो. या वेळी पोळा पाहण्यासाठी पंचक्रोशीतील नागरिक व गावातील महिला-पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित राहतात.

Leave A Reply

Your email address will not be published.