‘वंचित’ला धक्का ! माजी आ. हरिदास भदे करणार राष्ट्रवादीत प्रवेश

0

मुंबई : वंचित बहूजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांना आणखी एक धक्का बसला आहे. पक्षाचे नेते आणि माजी आमदार हरिदास भदे हे लवकरच राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत ते राष्ट्रवादीत प्रवेश करतील. अकोला पूर्वमधून ते विधानसभेवर निवडून आले होते. 26 फेब्रुवारीला त्यांनी आणि इतर 45 पदाधिकाऱ्यांनी आपले राजीनामे प्रकाश आंबेडकरांकडे पाठवले होते. त्यावेळेसच त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेशाचे संकेत दिले होते. या आधीही अनेक ज्येष्ठ नेत्यांनी प्रकाश आंबेडकरांची साथ सोडली आहे. त्यामुळे वंचितला मोठा धक्का बसला आहे.

भदे यांनी प्रकाश आंबेडकर यांच्यावर आरोप करत पक्ष सोडला होता. आंबेडकर हे सगळ्यांना सोबत घेऊन जात नाहीत, मनमानी करतात, विश्वासात घेत नाहीत, त्यांची कार्यशैली ही हुकूमशाही प्रवृत्तीची आहे असे आरोप केले होते. या आधीही त्यांच्यावर असेच आरोप झाले होते.

गेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत वंचितने निवडणूक लढविल्यामुळे कॉंग्रेस-राष्ट्रवादीला मोठा फटका बसला होता.

आता महाराष्ट्रात सत्तेत आल्याने राष्ट्रवादीची ताकद वाढली आहे. त्यामुळे वंचितच्या गडाला सुरुंग लावण्यासाठी राष्ट्रवादीने जोरदार मोहिम आखली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

दलीत आणि मुस्लिम मतदार हा वंचितच्या बाजूने झुकला होता. वंचितचे उमदवार जिंकले नसले तरी त्यांनी कॉंग्रेस राष्ट्रवादीचे उमेदवार पडतील एवढी मतं मिळवली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.