रेल्वे स्थानकांवर मिळणारी मोफत WiFi ची सेवा बंद

0

नवी दिल्ली : गुगलकडून रेल्वे स्थानकांवर मिळणारी मोफत WiFi ची सेवा आता मिळणार नाही. पाच वर्षांपूर्वी ही सेवा सुरू झाल्यापासून आतापर्यंत ऑनलाईन जाणे खूप सोपे आणि स्वस्त झाले आहे, असे म्हणत गुगलने मोफत वायफाय सेवा पुरवणारा Google Station हा प्रकल्प भारतासह अन्य देशांमध्येही बंद करत असल्याची माहिती सोमवारी दिली.

भारताशिवाय ही सेवा नायजेरिया, थायलंड, फिलिपाइन्स, मेक्‍सिको, इंडोनेशिया, ब्राझील व दक्षिण आफ्रिका येथेही पुरवली जात होती, पण आता तेथील सेवाही बंद केली जाईल. देशात आपली ऑनलाइन ओळख निर्माण करणे सोपे झाले असून इंटरनेटही स्वस्त झाले आहे. त्यामुळे आता स्टेशन सेवेची आवश्‍यकता उरली नसल्याचे कारण गुगलने दिले आहे. स्टेशनसेवेने देशातील 400 स्थानके 2020 च्या मध्यापर्यंत जोडण्याचे ध्येय गुगलने बाळगले होते. परंतु, हा आकडा 2018 मध्येच पार केल्याचे गुगलचे विभागीय उपाध्यक्ष सीझर सेनगुप्ता यांनी म्हटले आहे. सध्या देशातील अनेक स्थानकांतून ही सेवा सुरू आहे. अन्य ठिकाणीही ही सेवा दूरसंचार कंपन्या, आयएसपी आणि स्थानिक प्रशासकीय संस्था यांच्या सहकार्याने सुरू आहे.

आता बहुतांश ठिकाणी इंटरनेट डेटा स्वस्त आणि अगदी सहजपणे उपलब्ध आहे. सरकारकडून सगळ्यांना इंटरनेटची सेवा मिळावी यासाठी पावले उचलली जात आहेत. इंटरनेटबाबतच्या परिस्थितीत कमालीची सुधारणा झाली आहे. तर, काही देशांमध्ये या प्रोजेक्‍टसाठी तांत्रिक समस्यांचा सामना करावा लागतोय, यामुळे हा प्रोजक्‍ट बंद करण्यात येत आहे, असे कारण गुगलकडून देण्यात आले आहे.

 

सन 2015 मध्ये गुगलने भारतीय रेल्वे आणि रेलटेल यांच्यासमवेत मोफत सार्वजनिक वायफाय सेवा देणारी स्टेशन ही सेवा सुरू केली होती. गुगलने हा प्रकल्प बंद केल्यानंतरही भारतात रेल्वे स्थानकांवर मोफत वाय-फायची सेवा सुरूच असेल असं समजतंय. कारण, RailTel कडून ही सेवा सुरू राहील आणि देशभरातील 5,600 पेक्षा जास्त रेल्वे स्थानकांवर मोफत वायफाय सेवा पुरवले जाईल अशी माहिती आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.