रेमडेसिव्हीर इंजेक्शनच्या तुटवड्यामुळे कोरोना रूग्णांचे हाल

0

खामगाव (गणेश भेरडे )- बुलढाणा जिल्ह्यासह राज्यात कोरोना रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढू लागला आहे. त्यामुळे कोविड सेंटर व सरकारी रूग्णालये हाऊसफुल्ल झाल्याने कोरोना रूग्णांना नाईलाजास्तव खाजगी रूग्णालयांचा आधार घ्यावा लागत आहे, या पार्श्वभूमीवर कोरोना औषधांचा तुटवडा जाणवू लागला आहे. अशा परिस्थीतीत खाजगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या कोरोना बाधित रुग्णांच्या नातेवाईकांना रेमडेसिव्हीर इंजेक्शन मिळवण्यासाठी कसरत करावी लागत आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाकडून खाजगी रूग्णालयातील रूग्णांनाही इंजेक्शन देण्याची परवानगी देण्यात आल्याचे सांगण्यात येते. त्यातच रेमडेसिव्हीरचा तुटवडा किती दिवस राहणार? ही परिस्थिती केव्हा निवळणार? हे अद्याप स्पष्ट झाले नाही. त्यामुळे कोरोना रूग्ण मृत्यूशय्येवर मृत्युशी झुंज देत असल्याचे बोलले जात आहे? या परिस्थितीला नेमके जबाबदार कोण? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

कोरोनाच्या रूग्णांच्या वाढत्या संख्येमुळे कोविड सेंटर व सरकारी रूग्णालयामध्ये बेड शिल्लक नाही, खाजगी रूग्णालयात उपचार घ्यावयाचा झाल्यास रेमडेसिव्हीर इंजेक्शन मिळणे  कठीण झाले आहे. फक्त कोविड सेंटर व सरकारी रूग्णालयातील रूग्णांनाच इंजेक्शन देण्याचे सांगण्यात येते. त्यामुळे मेडिकल दुकानदारांवर दबाव येत असल्याने ते सुध्दा इंजेक्शनचा साठा बोलविण्याच्या मनस्थितीत नाही. त्यामुळे अशा रूग्णांचा वाली कोण? असा प्रश्न उपस्थित होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार कोविड सेंटर व सरकारी रूग्णालयांना सरळ वितरकांकडून रेमिडेसिव्हीरचा पुरवठा करण्यात येतो. तरी सुध्दा येथील रूग्ण नातेवाईकांना इंजेक्शनसाठी बाहेर भटकंती करावी लागते. तेव्हा येथील इंजेक्शन साठ्याची चौकशी कोण करणार की फक्त मेडिकल दुकानदारांनाच वेठीस धरणार,अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

यासंदर्भात अन्न व औषध प्रशासनाच्या बुलडाणा कार्यालयाशी संपर्क साधला असता रेमडेसिव्हीरच्या तुटवड्यामुळे संभ्रमावस्था निर्माण झाल्याने गोंधळ उडत आहे. रेमडेसिव्हीरचा पुरवठ्यानंतर परिस्थिती निवळेल, मात्र पुरवठा निश्चित केव्हा होईल हे कळू शकले नाही. तसेच मेडिकल दुकानदारांना खाजगी रूग्णालयातील कोरोनाबाधित रूग्णांनाही इंजेक्शन देण्याची परवानगी असल्याचे सांगण्यात आले.

शासकीय रुग्णालयात जरी औषधसाठा उपलब्ध असला तरी रूग्णांना बाहेरून औषधी आणावी लागत आहे. तर खासगी मेडिकलमध्ये मात्र अद्याप ही तुटवडा जाणवत आहे. बुलढाणा जिल्ह्यात वाढती कोरोना रुग्णाची संख्या आणि अपूर्ण आरोग्य सुविधेमुळे रुग्णांसह नातेवाईकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. जिल्ह्यातील खाजगी आणि सरकारी रुग्णालयात बेड उपलब्ध नाहीत. तसेच मोठ्या प्रमाणात रेमडेसिव्हीरचा तुटवडा आहे. अनेक गंभीर रुग्णांना  आणि मध्यम लक्षणे असलेल्या रुग्णांना रेमडेसिव्हीर इंजेक्शन मिळत नाही. त्यामुळे त्यांची परिस्थिती बिकट होत चालली आहे. तर इंजेक्शनसाठी रुग्णांचे नातेवाईक यांची मोठी धावपळ होत आहे.  मात्र याबाबत अन्न आणि औषध प्रशासन तसेच प्रशासकीय यंत्रणा म्हणावी तशी कार्यान्वित झालेली दिसत नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.