मोकाट व पिसाळलेल्या कुत्र्यांचा बंदोबस्त करणार केव्हा ?

0

(चांगभल )

धों. ज. गुरव (मो.नं.9527003897)

सोमवार आणि मंगळवार लागोपाठ दोन दिवस जळगाव शहरात मोकाट व पिसाळलेल्या कुत्र्यानी धुमाकूळ घातला . सोमवारी दोन चिमुकल्यावर हल्ला करून त्यांचे लचके तोडले . एका 60 वर्षीय वृद्धाला चावा घेऊन त्याला रक्तबंबाळ केले,लागोपाठ दुसरे दिवशी म्हणजे मंगळवारी एका 6 वर्षीय बालकाला 7-8 कुत्र्यांच्या घोळक्याने त्याचेवर हल्ला केला. कुत्र्याच्या घोळक्यातील प्रत्येक कुत्रा या 6 वर्षीय बालकावर तुटून पडले होते . तेथे आलेल्या काही तरुणांनी दगडांचा मारा करून कुत्र्यांना पसार केले . अन्यथा तो 6 वर्षीय बालक कुत्र्यांच्या तावडीतून वाचला नसता. हि घटना खुद्द महापौरांचा प्रभाग असलेल्या कोल्हे नगरात घडली. कोल्हे नगरात प्रा. निलेश चौधरी यांचे त्यांच्या राहत्या घरीच मौर्यन नावाचे क्लासेस चालवतात . प्रा. निलेश चौधरी यांचा मौर्यन नावाचा 6 वर्षीय मुलगा सेंट जोसेफ हायस्कुलमध्ये पहिलीच्या वर्गात शिकतो . मंगळवारी सकाळी 7;30 वाजेच्या सुमारास तो त्याच्या घराच्या मागील बाजूस असलेल्या वाळूच्या ढिगार्‍यावर खेळण्यासाठी बेबी सायकलने गेला होता . वाळूच्या ढिगार्‍याजवळ बसलेल्या 8 ते 10 कुत्र्यानी एकदम मौर्यनवर हल्ला केला. कुत्रे अंगावर आल्याने मौर्यन बेबी सायकलीवरून खाली पडला . त्यावेळी कुत्र्यांनी त्याच्या हातापायाचे लचके तोडायला सुरुवात केली . त्यात तो गंभीर जखमी झाला . जिवाच्या आकांताने मौर्यन आरडाओरड करीत असतांना गटार साफ करणार्‍या तरुणाने तसेच सायकलीवरून जाणार्‍या तरुणाने पाहिले. दोघांनी मिळून कुत्र्यांवर दगडाचा मारा केला . तेव्हा ते कुत्रे तेथून पसार झाले . त्यानंतर शेजार्‍यांनी प्रा. निलेश चौधरी यांना कळविले. कुत्र्याच्या हल्ल्यात जखमी मौर्यन याला घेऊन ताबडतोब जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले आणि तातडीने डॉक्टरांनी त्याचेवर उपचार केले म्हणून मौर्यनचे प्राण वाचले. अशीच घटना आशाबाबा नगरातील रहिवाशी तीन वर्षाची हर्षदा बारी हिला कुत्र्याने चावा घेतला . तेव्हा तेथे गर्दी जमली आणि गर्दीतील 8 वर्षाच्या रोहन देशमुखच्या पायाला आणि मानेजवळ कुत्र्याने चावा घेतला . अर्ध्या तासांनंतर पिसाळलेल्या याच कुत्र्याने मुरलीधर लक्ष्मण सोनार या 40 वर्षीय वृद्धाच्या पायाला चावा घेतला . यासर्वांवर जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले .
जळगाव मनपातर्फे जळगावकरांना पाणी,रस्ते वीज आरोग्य आदी मूलभूत नागरी सुविधा मिळाव्यात म्हणून टाहो फ़ोडतच असतात . या सुविधा देण्यात मनपा पिछाडीवर असली तरी किमान शहरातील नागरिकांच्या जीवनाशी तरी खेळ खेळता कामा नये . शहरात राहणारा प्रत्येक नागरिक कर भरतो. आणि त्यापोटी सुविधा मिळाव्यात एवढी अपेक्षा करतो. मोकाट आणि पिसाळलेल्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची जबबाब्दारी महापालिकेचीच आहे . यासाठी महापालिकेत एक स्वतंत्र विभाग कार्यरत असतो . मोकाट आणि पिसाळलेला कुत्रा एखाद्या बालकाला ,तरुणाला किंवा वृद्धाला चावा घेतला तर त्याच्या रेबीजमुळे जीवाला धोका निर्मण होऊ शकतो . त्यामुळे ज्याला चववा घेतलेला असतो त्याच्या नातेवाईकांमध्ये घबराट निर्माण होते . चावा घेतल्यावर रुग्णालयात उपचार होईपर्यंत आणि त्याला डिस्चार्ज मिळेपर्यंत त्याचे नातेवाईक जीव मुठीत धरूनच असतात . डिस्चार्ज मिळाल्यानंतर ते सुटकेचा श्‍वास घेतात . तरी चावणार्या कुत्र्याच्या रेबीजचा पुन्हा केव्हा असर होईल हि भीती त्यांच्या मनात असते ती वेगळी! एकंदरीत मोकाट कुत्र्यांपासून जळगावकरांना  मनपाकडून संरक्षण मिळाले पाहिजे . रात्री-अपरात्री कामावरून अनेकजण पायी ,सायकलीवर ,दुचाकीवरून आपल्या घरी जातात . असावेळी रस्त्यावरील मोकाट कुत्रे त्यांच्यावर ओरडत धावले तरी त्यांची त्रेधातिरपीट उडते . गेल्या अनेक वर्षांपासून मनपाने या मोकाट कुत्र्यांचा आणि पिसाळलेल्या कुत्र्याचं बंदोबस्त करू शकली नाही . त्याचे कारण मात्र कळत नाही . महापालिकेचे महापौर , उपमहापौर व इतर पदाधिकारी व नगरसेवकांनी आपापल्या प्रभातील मोकाट कुत्र्याचा बंदोबस्त करण्यासाठी प्रयत्न करावेत . विशेषतः नवे आयुक्त चंद्रकांत डांगे यांनी याकडे लक्ष घातले तर कुत्र्यांचा बंदोबस्त होऊ शकतो.
महापौर ललित कोल्हे यांच्या प्रभागात मोकाट कुत्र्यानी हैदोस घातल्यानंतर त्यांनी याबाबतीत पुढाकार घेऊन बंदोबस्त करावा . हा बंदोबस्त का होत नाही याबाबत माहिती घेतली असता कुत्रयांचा बंदोबस्त करण्यासाठी काढण्यात आलेल्या निविदेला कंत्राटदारांचा प्रतिसाद मिळत नाही असे सांगण्यात येते . एकदा नव्हे ता सहावेळा निविदा प्रसिद्ध करण्यात आली . पण प्रतिसाद मिळाला नाही . मनपाच्या या उत्तराने कोणाचेही समाधान होणार नाही . राज्याआतील इतर माहापालिकेच्या शहरात जाऊन अभ्यास करावा . मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त कसा करतात ते पाहावे . पुणे मनपाच्या क्षेत्रातील मोकाट कुत्र्यानं पकडून त्यांना जंगलात सोडले जाते . त्याचबरोबर कुत्र्याची संख्या वाढू नये यासाठी निर्बीजीकरणाचे इंजेक्शन दिले जाते . तशाप्रकारच्या उपाययोजना जळगाव येथे का करू नये . केवळ निविदेला प्रतिसाद मिळत नाही म्हणून हात वर करणे याचा अर्थ जबाबदारी झटकण्याचा प्रकार होय . मोकाट कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी अनेक आधुनिक पद्धतीच्या उपाययोजना आहे . तेव्हा मनपाला जबाबदारी झटकता येणार नाही . तसे केले तर जळगावकर जनता त्यांना माफ करणार नाही .

Leave A Reply

Your email address will not be published.