मुक्ताईनगरातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अधिकाऱ्यांची बैठक

0

मुक्ताईनगर (प्रतिनिधी) :- शहरातील कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी खा.रक्षाताई खडसे यांनी मुक्ताईनगर येथील तहसील कार्यालयात, तालुक्यातील आरोग्य विभागासह इतर विभागातील प्रमुख अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली.

याप्रसंगी खासदार रक्षाताई खडसे, नगराध्यक्षा नजमाताई तडवी, तहसीलदार शाम वाडकर, पो.नि.श्री. शिंदे, नगरपंचायतीचे मुख्याधिकारी श्री. जगदाळे, आरोग्य अधिकारी डॉ‌.पाटील, डॉ.राणे, नायब तहसीलदार प्रदीप झांबरे व इतर उपस्थित होते. कोरोना संकटासंदर्भातील सर्व शक्यतांचा अभ्यास करून उपाययोजनांचे काटेकोर नियोजन करा. ‘कोरोना’शी लढण्यासाठी योग्य नियोजन करत सर्व विभागांनी समन्वय ठेवून काम करावे, अशा सूचना खासदार रक्षाताई खडसे यांनी आज दिल्या.

कोविड रुग्णालय व विलगिकरण केंद्र येथे रुग्णांना किंवा त्यांच्या नातेवाईकांना स्वच्छ पाणी, पोषक आहार मिळेल याकडे लक्ष द्यावे. कोविड सेंटर व विलगिकरण केंद्र येथे स्वच्छता राखावी. कोरोना रुग्ण व संशयित यांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी त्यांचे समुपदेशन करण्यात यावे. मुक्ताईनगर शहरातील बँकांवर संपूर्ण तालुक्याचा भार आहे. बँकांमध्ये खातेदारांमध्ये सोशल डिस्टनसिंग पाळले जाण्यात कुचराई होता जमा नये. खातेधारकांचे काम लवकरात लवकर पूर्ण होईल याची काळजी घ्यावी. मुक्ताईनगर शहरात कोरोनाचा शिरकाव वाढला असल्याने शहरातील प्रत्येक घरात जावून प्रत्येक सदस्यांची थर्मल तपासणी अंगणवाडी कर्मचारी, आशा कर्मचारी व जिल्हा परिषद शिक्षक यांच्या पथकामार्फत करण्यात यावी.

खासदार रक्षाताई पुढे म्हणाल्या, कोरोना संसर्ग रोखण्यासाठी सार्वजनिक शिस्त लावावी लागणार आहे. वैयक्तिक मास्कचा वापर, योग्य आंतर ठेवण्याची दक्षता घ्यावी व कोरोनावर मात करण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती करावी. सूक्ष्म नियोजनाद्वारे प्रभावीपणे उपाययोजनांची अंमलबजावणी करा, लॉकडाऊनच्या कालावधीत सर्व नियमांची अंमलबजावणी काटेकोरपणे होणे आवश्यक आहे. सीमेबाहेरून कुणी व्यक्ती येत असल्यास काटेकोरपणे तपासणी, संस्थात्मक विलगीकरण या गोष्टी पाळल्या गेल्याच पाहिजेत. बाहेरून येऊन कोणामार्फत संसर्ग पसरणार नाही, याची काळजी घ्यावी लागेल. बाहेरून येणाऱ्या बाधित व्यक्तींमध्ये अनेकदा ‘कोरोना’ची लक्षणे दिसत नाहीत. परंतु त्यांच्या मार्फत संसर्ग पसरण्याचा धोका अधिक असतो. त्यामुळे त्यांच्याबाबत काटेकोर कार्यवाही व्हावी. आवश्यक तिथे इतर यंत्रणांचे सहकार्य घ्यावे, अशा सूचनाही खासदार रक्षाताई खडसे यांनी केल्या.

सद्यस्थितीत आपण सर्वजण विविध अडचणींचा मुकाबला करत आहोत. मात्र, या काळात अधिक काटेकोरपणे काम करण्याची गरज आहे. त्यामुळे परिस्थितीचे गांभीर्य ओळखून काम करावे. कोणत्याही परिस्थितीत कंटेनमेंट झोनमध्ये कडक बंधने पाळली जातील, याकडे लक्ष द्यावे, मुक्ताईनगर शहरातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखणे हे आज आपल्यापुढील सर्वात मोठे आव्हान आहे. या काळात शासन, प्रशासन, विविध यंत्रणा अनेक आघाड्यांवर लढत आहेत. कोरोनाविरुद्धची लढाई सर्वांचीच असून नागरिकांची त्याला साथ मिळणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.