मुंबईत रुग्ण संख्या वाढतेय, मात्र मृत्युदर १ टक्क्यापेक्षाही कमी

0

मुंबई : राज्यात सलग दुसऱ्या दिवशी ८ हजार पेक्षा जास्त करोना रुग्णांची नोंद झाली आहे. गुरुवारी ८,७०२ नागरिकांचा करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. ५६ रुग्णांचा मृत्यू झाला. मुंबईतही सलग दुसऱ्या दिवशी १ हजारपेक्षा जास्त करोना रुग्णांची नोंद झाली. काल मुंबईत १,१४५ करोना रुग्णांची नोंद झाली. त्याआधी बुधवारी १,१६७ करोना रुग्णांची नोंद झाली होती.

महाराष्ट्रात आतापर्यंत २१ लाख २९ हजार ८२१ जणांना करोनाची बाधा झाली असून ५१,९९३ रुग्णांचा या व्हायरसमुळे मृत्यू झाला आहे. मुंबईत करोनामुळे रुग्ण दुप्पटीचा कालावधी २७३ दिवस झाला आहे. १८ ते २४ फेब्रुवारी दरम्यान करोना रुग्णवाढीचे प्रमाण ०.२५ टक्के आहे. मुंबईत सध्या करोनाचे ८,९९७ अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. करोनामुळे मुंबईत काल पाच रुग्णांचा मृत्यू झाला.

ज्या पाच रुग्णांचा मृत्यू झाला, त्यांना सहव्याधी होत्या. त्यांचे वयही ६०च्य पुढे होते. मुंबईत करोना रुग्णसंख्येत मोठी वाढ होत असली, तरी मृत्यूदर एक टक्क्यापेक्षाही कमी आहे, असे डेथ ऑडिट कमिटीचे प्रमुख डॉ. अविनाश सुपे म्हणाले. ही करोना रुग्णवाढ होतेय, त्याचा नेमका परिणाम काय होणार? ते दहा दिवसांनीच लक्षात येईल असे सुपे यांनी सांगितले. संपूर्ण राज्यात काल ५६ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला. बुधवारच्या तुलनेत हे प्रमाण थोडे कमी आहे. बुधवारी करोनामुळे ८० रुग्णांचा मृत्यू झाला होता. ५६ पैकी २० रुग्णांचा मृत्यू ४८ तासात झाला आहे तर उर्वरित ३६ मृत्यू काही आठवडे आधी झाले आहेत.

दरम्यान मुंबईत दररोज सापडणाऱ्यां पॉझिटिव्ह रुग्णांपैकी ८० ते ८५ टक्के रुग्णांमध्ये करोनाची कुठलीही लक्षणे नाहीत. पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी ही माहिती दिली आहे. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे. बुधवारी मुंबईत ११०० पेक्षा जास्त करोना रुग्ण सापडले पण त्यातल्या ८३ टक्के रुग्णांमध्ये करोनाची कुठलीही लक्षणे नव्हती असे चहल यांनी सांगितले. लक्षणे नसलेल्या रुग्णांना दाखल करुन घेऊ नका, असे पालिका आयुक्तांनी खासगी रुग्णालयांना निर्देश दिले आहेत. महत्त्वाचं म्हणजे राज्यातील ७८ टक्के अ‍ॅक्टिव्ह रुग्ण हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल आहेत, तेच मुंबईत ४९ टक्के अ‍ॅक्टिव्ह रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.