महात्मा गांधीजींबाबत हिंदू महासभेचे कृत्य राष्ट्रखंडनाचे

0

गांधी रिसर्च फाऊंडेशनचे राष्ट्रीय ऐक्य अबाधित ठेवण्यासाठी निवेदन

जळगाव दि. 5-
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त जगभर विविध कार्यक्रम होत असताना अलीगढ येथे महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला गोळ्या घालून कृत्रिमपणे रक्तस्रावाचा आभास आणून हिंदूमहासभेच्या काही कार्यकर्त्यांनी त्यांची बिभत्सना केली आहे. हिंदू महासभेच्या या कृत्याचा गांधी रिसर्च फाऊंडेशनने निवेदनाव्दारे निषेध केला आहे. अशा कृत्यांचा निषेध करून राष्ट्रीय ऐक्य अबाधित राखण्याचे आवाहन फाऊंडेशनच्यावतीने करण्यात आले आहे.
राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या प्रतिमेला छेद देण्याचा प्रयत्न करण्याची ही घटना निंदनीयच आहे. अशा घटना घडवून आणणे काही लोकांसाठी खेळ झाला आहे, ही चिंतेची बाब आहे.
या घटनेतून काही प्रश्न निर्माण झाले आहेत. या घटनेविषयी हिंदू महासभेचे वरिष्ठ नेते मौन बाळगुन आहेत, त्यांच्या मौनाचे कारण काय? अशा मौनाला घटनेत सहभागी असलेले मंजुरी समजतात आणि अशा घटना वारंवार करण्यातच शौर्य असल्याची त्याची भावना होते. प्रसार माध्यमांनी अशा घटना वारंवार दाखवून अशा घटनेला योग्य ठरविण्याचा प्रयत्न करणे कितपत योग्य आहे?
गांधी रिसर्च फाऊंडेशनने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सत्य, अहिंसा, बंधुत्व, प्रेम आणि करूणा या सिद्धांतावर आपल्या राष्ट्राची उभारणी झाली आहे. या सगळ्या गुणांमधुनच नागरिकांच्या मनात देशभक्तीची भावना निर्माण होत असते. या सिद्धांतांना मूर्तरूप देणारे व्यक्तीमत्व म्हणजे महात्मा गांधीजी. त्यांची अशा प्रकारे बिभत्सना करणे म्हणजे घृणास्पदच; आहे. अशा घटनांमधुन युवकांना राष्ट्रविरोधी कार्यात प्रोत्साहन देणार्‍या या घटनेतील कार्यकर्त्यांचा निषेध व्यक्त करत देशात सद्भावनेची, राष्ट्रीय एकात्मतेची भावना जागृत करूया, शांतता राखूया असे आवाहन गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे करण्यात आले आहे.
अलिगढ येथील घटनेतील महिला, पुरूषांच्या कृतीतून त्यांचे बेताल बुद्धिचे दर्शन घडत असून ही प्रवृत्ती कुणाच्याही हिताची नाही. ग्रामीण आणि शहरी भारतातल्या वंचित लोकांच्या कल्याणाकरिता रचनात्मक कार्य करण्यासाठी आपली ऊर्जा आणि शक्तीचा प्रयोग करण्याची अपेक्षा गांधी रिसर्च फाऊंडेशनने व्यक्त केली आहे. तसेच गांधीजींचे विचार, सिद्धांत अधिकृत दस्ताऐवजांच्या आधारे अभ्यासण्यासाठी गांधी रिसर्च फाऊंडेशनमध्ये उपलब्ध आहेत. त्यांचा अभ्यास आपल्याला केव्हाही करता येऊ शकतो.
केंद्र सरकार, राज्य सरकार आणि माध्यमातील अभ्यासकांना नम्र निवेदन करतो की महात्मा गांधीजींच्या हत्येमागील तथ्य नेमके काय आहेत, हे जाणून घ्यावे. गांधीजींच्या हत्येमागील सत्यतेशी संबंधित महत्वाचे दस्तावेज गांधी रिसर्च फाऊंडेशनमध्ये उपलब्ध आहेत. त्यांचा अभ्यास करून गांधीजींच्या हत्येमागील सत्यता लोकांसमोर अधिक प्रभावीपणे आणण्यासाठी हे दस्तावेज खुले आहेत. गांधीजींचे विचार योग्य पद्धतीने समजून घेण्यासाठी गांधी रिसर्च फाऊंडेशनचे समृद्ध ग्रंथालय सर्वासाठी खुले आहे. तसेच प्रसार माध्यमांनी अशाप्रकारच्या वृत्तांना प्रसिद्धी देताना नैतिकतेचे भान राखायला हवे अशी अपेक्षा निवेदनाच्या माध्यमातून गांधी रिसर्च फाऊंडेशनचे डीन डॉ. जॉन चेल्लादूराई यांनी व्यक्त केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.