मनपा उपायुक्‍तांच्‍या गाडीवर दगडफेक

0

जळगाव : कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. अशात शासनाकडून निर्बंध लावण्यात आले आहेत. शिवाय विना मास्‍क फिरणाऱ्यांवर स्‍थानिक प्रशासनाकडून कारवाई करण्यात येत आहे. अशाच प्रकारची कारवाई करण्यासाठी रस्‍त्‍यावर उतरलेल्‍या महापालिका उपायुक्‍तांच्या गाडीवर हल्‍ला चढवून गाडीचा काच फोडण्यात आला.

आज (ता.६) बागवान मोहल्ला परिसरात विना मास्क असलेल्या नागरिक व हॉकर्सवर कारवाई करण्यासाठी मनपा उपायुक्त संतोष वाहूळे गेले होते. दरम्‍यान त्‍यांच्या वाहनावर दगडफेक करण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. कोरोना संसर्ग वाढू नये याकरीता प्रशासनाकडून नियमावली लावण्यात आली आहे. तरी देखील नागरिकांकडून त्याचे पालन केले जात नाही. यामुळे प्रशासनाकडून कारवाई करण्यात येत आहे. महापालिका प्रशासनासह जिल्‍हा प्रशासन देखील कारवाई करण्यासाठी रस्‍त्‍यावर उतरत आहे.

शहरातील शनीपेठ, बळीराम पेठ, सुभाष चौक परिसरात उपायुक्त संतोष वाहूळे यांच्यासह मनपा अतिक्रमण पथकाकडून कारवाई केली जात आहे. उपायुक्त संतोष संतोष वाहूळे हे सराफ बाजारकडून जोशीपेठकडे जात असताना बागवान गल्लीजवळ काही हॉकर्स व नागरिक विना मास्क असल्याचे निदर्शनास आले. मास्‍क लावण्याबाबत उपायुक्तांनी त्यांना हटकले असता जमाव त्यांच्यावर धावून आला. यावेळी उपायुक्त वाहूळे वाहनात बसून निघत असताना जमावाने वाहनावर दगडफेक केली. यात गाडीच्या मागील काच फुटला आहे. सदर घटनेनंतरची पुढील कारवाई मनपा प्रशासनाकडून करणे सुरू आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.