भुसावळ तालुक्यातील शेतकऱ्यांचे ३६ हजाराचे बिल झाले चक्क २३ हजार

0

भुसावळ (प्रतिनिधी) :- तालुक्यातील किन्ही गावातील शेतकऱ्यांना अतिरिक्त व चुकीचे वीज बिल देण्यात आले होते. ३ अश्व शक्तीच्या पंपाला मागील दीड वर्षांपासून तीन महिन्याला १९५० युनिटचे ३७ हजार५६० रुपयाचे देयक देण्यात आले होते. या भागात वेगवेगळ्या क्षेत्राच्या शेतीला समान १९५० युनिटचे बिल देण्यात आले व शेतकऱ्यांचा संताप अनावर झाला व शिवसेनेकडे तक्रार केली.

भुसावळ ग्रामीण विभागाचे अभियंते डी.पी.धांडे यांच्यासमोर शिवसेनेचे तालुका संघटक प्रा.धिरज पाटील, अविनाश पाटील, सागर वाघोदे, योगेश कोलते यांनी सदर चुकीचा प्रकार उघडकीस आणल्यानंतर त्यांनी कार्यवाही केली. तसेच ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्याकडे भुसावळ तालुक्यातील शेती पंपाच्या अतिरिक्त बिला विरोधात तक्रार दाखल केलेली होती, शेतकऱ्याचे ३६५६०/- रुपयाचे बिल जवळपास १३ हजार रुपये कमी होऊन चक्क २३ हजार ३५०/- झाले व शिवसेनेचे तालुका संघटक प्रा.धिरज पाटील यांच्या प्रयत्नांना यश आले.

व्याजाच्या नावावर शेतकऱ्याची पिळवणूक
शेतकऱ्याला दिलेल्या याबिलात थकबाकी वरील व्याजच ४५३० रुपये व चालू महिन्याचे व्याज १४९४ रुपये असे दिले आहे. मागील तीन महिन्यात शेतकऱ्याच्या हातात बील मिळाले नाही तर व्याज लावले कसे गेले? व्याजाच्या नावावर शेतकऱ्याची आर्थिक पिळवणूक करीत आहे. जळगाव विभागाचे मुख्य अभियंता दीपक कुमठेकर यांच्याकडे तक्रार दाखल केली.

अतिरिक्त देयक भरणाऱ्या *ग्राहकाला महावितरणने व्याज द्यावे: प्रा.धिरज पाटील
सरासरी बिल, चुकीचे रिडींग, एका ग्राहकाचे बिल दुसऱ्या ग्राहकाला अश्या हजारो तक्रारी भुसावळ तालुक्यात प्रलंबित आहेत. बऱ्याच ग्राहकांनी हजारो रुपयांची अतिरिक्त देयके भरलेली आहेत. ज्या प्रमाणे थकबाकीवर व्याज लावून पैसे वसूल केले जातात, त्याच प्रमाणे ग्राहकाने अतिरिक्त बिल भरल्यास त्याला व्याज महावितरण का देत नाही? साधारण १८ टक्के व्याजाने ग्राहक थकबाकी भरतो तर त्याच धर्तीवर महावितरणने अतिरिक्त बिल भरणाऱ्या ग्राहकाला १८ टक्के व्याज द्यावे बिलात ऍडजस्ट करू नये अशी मागणी प्रा.धिरज पाटील यांनी केली आहे.

शिवसेना जिल्हा प्रमुख व आमदार चंद्रकांत पाटील, तालुका प्रमुख समाधान महाजन यांनी भुसावळ तालुक्यातील शेतकऱ्यांनी बिला संबंधीच्या तक्रारी असल्यास शिवसेना पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.