भुसावळात बामणोदच्या विवाहितेवर सामूहिक बलात्कार

0

रेल्वे स्थानकातून केले अपहरण ; चार दिवस अत्याचार

भुसावळ :- यावल तालुक्यातील बामणोद येथील रहिवासी असलेल्या २२ वर्षीय विवाहित महिलेवर भुसावळात सामूहिक अत्याचार (गँगरेप) झाल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.

या प्रकरणी फैजपूर पोलिसात गुन्हा दाखल होवून तो लोहमार्ग पोलिसात वर्ग करण्यात आला. बामणोद येथील पीडीत महिला घरातून संतापाच्या भरात ११ एप्रिल रोजी निघाल्यानंतर भुसावळ रेल्वे स्थानकावर आली तर दोघांनी तिचे अपहरण करून तिच्यावर चार दिवस अत्याचार केल्याचा आरोप या पीडीत महिलेने तक्रारीत केला आहे. या प्रकरणी लोहमार्ग पोलिसांनी पीडीतेचा जिल्हा सामान्य रुग्णालयात जावून जवाब घेतला तर रविवारी तिची वैद्यकीय चाचणी देखील करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

आई व भावाशी वाद झाल्याने बामणोद येथील २२ वर्षीय विवाहित महिला संतापाच्या भरात ११ रोजी भुसावळ रेल्वे स्थानकावर आल्यानंतर दोन संशयीतांनी विवाहितेच्या डोळ्यावर पट्टी बांधून तिचे अपहरण करीत तिच्यावर सलग चार दिवस अत्याचार केला व  तिला पुन्हा रेल्वे स्थानकावर सोडल्याची तक्रार या  महिलेने केली आहे. तत्पूर्वी या महिलेला गावातील एका तरुणाने रेल्वेस्थानकावर फिरताना पाहिले यावरून  पीडीतेच्या नातेवाईकांना कळविण्यात आले.

दरम्यान नातेवाईकांनी तिचा ताबा घेत फैजपूर पोलिस ठाणे गाठून तक्रार नोंदवली. या विवाहितेला जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले असून या प्रकरणी रविवारी रात्री उशिरा लोहमार्गचे निरीक्षक दिलीप गढरी यांनी या महिलेचा जवाब नोंदवला आहे.

लोहमार्गचे निरीक्षक दिलीप गढरी यांनी दिलेल्या माहितीनुसार पीडीत विवाहित महिला दरवेळी जवाब बदलत असल्याचे आढळत आहे. आधी अपहरण करून अत्याचार केल्याची तक्रार या महिलेने केली व दोन जणांनी रेल्वे स्थानकावरून अपहरण केल्याचा जवाब फैजपूर पोलिसांना दिला तर सायडींगच्या बाजूला असताना संशयीतांनी आपले अपहरण करून डोळ्याला पट्टी बांधत निर्जन स्थळी नेवून अत्याचार केल्याचे तसेच काही अश्लील फोटोही काढल्याचा जवाब  लोहमार्ग पोलिसांना  दिला आहे त्यामुळे नेमके काय व कसे घडले? याबाबत पोलीस कसून तपासणी करीत असल्याचे गढरी म्हणाले तसेच लोहमार्ग पोलिसांकडून पीडीतेच्या जवाबाच्या अनुषंगाने ११ ते १३ एप्रिल दरम्यानच्या फुटेजची पाहणी केली जात आहे. या महिलेकडे तिकीट नसल्याने तिकीट निरीक्षकाने देखील तिला हटकल्याची बाब समोर आली आहे. पीडीतेच्या तक्रारीनुसार अनोळखींनी तिचे अपहरण करून अत्याचार केल्याचे नमूद आहे तर या अनुषंगाने लोहमार्ग पोलिसांकडून बारकाईने या बाबी तपासल्या जात आहे. दरम्यान, रविवारी सायंकाळी लोहमार्गचे पोलिस उपअधीक्षक विलास नारनवर यांनी पीडीतेची भेट घेवून माहिती जाणून घेतली.

Leave A Reply

Your email address will not be published.