नगर जिल्ह्यातील चौघांच्या हत्येप्रकरणी ५ जणांना जळगावातून अटक

0

जळगाव (प्रतिनिधी) । स्वस्तात सोने देण्याच्या वादातून नगर जिल्ह्यातील चौघांची हत्या करणाऱ्या ५ संशयितांना जळगावातून अटक करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. नरेश उर्फ बाळा जगदीश सोनवणे (वय२२), कल्पना किशोर सपकाळे (वय ४०), आशाबाई जगदीश सोनवणे (वय ४२), प्रेमराज रमेश पाटील (वय२२) आणि योगेश मोहन ठाकूर (वय२२) (सर्व राहणार हरीविठ्ठल नगर) असे या पाच संशयितांना सकाळी पोलिसांनी अटक केली आहे.

याबाबत अधिक असे की, नगर जिल्ह्यातील काही जणांनी विसापूर फाट्याजवळ जळगावच्या हरिविठ्ठल नगरातील काही जणांना स्वस्तात सोन्याचे आमीष दाखवून बोलविले. आपली फसवणूक होवू शकते याची शक्यता असल्याने जळगावचे व्यक्ती तयारीनिशी आले होते. याप्रसंगी समोरच्यांनी जळगावच्या लोकांना बनावट सोने देऊन त्यांच्या कडील पैशांची बॅग घेऊन पळ काढण्याचा प्रयत्न केला. यामुळे दोन्ही गटांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. यात जळगावमधील एकाने चौघांवर चाकू हल्ला केला आणि चौघांना जागीच ठार करून जळगाव दिशेने निघून गेले.

या हाणामारीत सुरेगाव येथील नातीक कुंजीलाल चव्हाण (४० ), नागेश कुंजीलाल चव्हाण (१६ ), श्रीधर कुंजीलाल चव्हाण (३५) आणि देऊळगाव सिद्धी येथील लिंब्या हब्र्या काळे (२२) यांचा खून झाला. एकाच वेळी चौघांचा खून झाल्याने प्रचंड खळबळ उडाली.

ज्या ठिकाणी चौघांची हत्या करण्यात आली. त्या ठिकाणी मयत व आरोपीत झटापट झाली. एका जळगाव येथील आरोपीचे एटीएम कार्ड घटनास्थळी पडले होते. ते एटीएम कार्ड पोलिसांच्या हाती लागले होते. यावरून या प्रकरणाचे धागेदोरे हे जळगावपर्यंत पोहचले असल्याचे लक्षात आले. या अनुषंगाने जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. पंजाबराव उगले यांना याबाबत संपर्क करण्यात आला. त्यांनी एलसीबीचे निरिक्षक बापू रोहम यांच्याकडे ही जबाबदारी सोपवली.

Leave A Reply

Your email address will not be published.