ठाकरे सरकारकडून ‘अनलॉक 6’ची नवी नियमावली जारी ; जाणून घ्या काय बंद, काय सुरु?

0

मुंबई: राज्य सरकारनं अनलॉक संदर्भात नवी नियमावली प्रसिद्ध केली आहे. राज्यात उद्या 5 नोव्हेंबरपासून थिएटर्स 50 टक्के क्षमतेने सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे.  मात्र नाट्यगृहं, सिनेमागृहं, मल्टिप्लेक्सेस खाद्यपदार्थ नेण्यास परवानगी नसेल. याबरोबरच अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.

राज्य सरकारनं बॅडमिंटन, टेनिस, स्क्वॉश या इनडोअर खेळांसह इनडोअर शूटिंग रेंज सुरू करण्यासही परवानगी दिली आहे. सॅनिटायझेशनची व्यवस्था आणि फिजिकल डिस्टन्सिंगचे नियम पाळून खेळाडूंना या ठिकाणी सराव करता येईल. राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय खेळाडूंच्या सरावासाठी जलतरण तलाव सुरू करण्यासही राज्य सरकारनं परवानगी दिली आहे. मात्र कंटेन्मेंट झोनमधील जलतरण तलाव बंदच राहतील.

कंटेन्मेंट झोनच्या बाहेर असणारी योगा अभ्यास केंद्रं सुरू करण्याची मुभादेखील देण्यात आली आहे. यासाठीची नियमावली सार्वजनिक आरोग्य विभाग जारी करेल. त्यासाठी हा विभाग केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं प्रसिद्ध केलेल्या नियमावलीचा आधार घेईल, असं सरकारनं पत्रकात म्हटलं आहे.

गेल्या सात महिन्यांपासून राज्यातील चित्रपटगृहं, नाट्यगृहं बंद आहेत. त्यामुळे या क्षेत्राचं प्रचंड मोठं नुकसान झालं आहे. फिजिकल डिस्टन्सिंगसह अन्य नियम पाळून चित्रपटगृहं, नाट्यगृहं, मल्टिप्लेक्सेस सुरू करण्याची मागणी या क्षेत्रामधून गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होती. अखेर राज्य सरकारनं मनोरंजन क्षेत्राला दिलासा दिला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.