जम्मू-काश्मिरात राष्ट्रपती राजवट लागू करा: उमर

0

नवी दिल्ली

जम्मू आणि काश्मीर राज्यात कोणत्याही पक्षाकडे बहुमत नसल्यानं राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष नॅशनल कॉन्फरन्सचे नेते आणि माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी राज्यपाल एन.एन. वोहरा यांच्याकडे केली. मात्र राष्ट्रपती राजवटीचा कालावधी मोठा नसावा अशी विनंतीही त्यांनी राज्यपालांना केली. जम्मू-काश्मीरमध्ये मुफ्ती सरकार कोसळल्यानंतर अब्दुल्ला यांनी राज्यपाल एन. एन. वोहरा यांची भेट घेऊन राजकीय परिस्थितीवर चर्चा केली.

२०१४च्या निवडणुकीत आम्हाला जनादेश मिळालेला नाही, तसेच आताही आमच्याकडे तो नाही. तसंच कुणीही आमच्याशी बोलणी केलेली नाहीत, ना आम्ही कुणाशी बोलणी केलेली आहे, तसंच कोणत्याही पक्षाकडे बहुमत नाही, अशा स्थितीत राष्ट्रपती राजवट लागू करणंच योग्य असल्याचं आपण राज्यपालांना सांगितल्याचं अब्दुल्ला म्हणाले.

राज्यपालांनी हा निर्णय घेतल्यास आमच्या पक्षाचा त्यांच्या निर्णयाला पूर्ण पाठिंबा असेल, असा विश्वासही अब्दुल्ला यांनी राज्यपालांना दिला.

Leave A Reply

Your email address will not be published.