गाडगेबाबा अभियांत्रिकीत अत्याधुनिक रोबोटिक्स लॅबची स्थापना : डॉ.राहुल बारजिभे

0

भुसावळ (प्रतिनिधी)- ग्राहकांच्या विविध गरजा लक्षात घेऊन त्यांच्याशी समन्वय आणि संपर्क साधण्याचे कौशल्य रोबोंना प्राप्त करून देण्याचे तंत्रज्ञान विकसित होत आहे. अंतराळातील नव्या विश्वाच्या शोधापासून नव्या विश्वातील वसाहतीच्या निर्मितीमध्ये या रोबोंची कामगिरी अनन्यसाधारण राहणार आहे. ज्या ठिकाणी मानवी जीवन धोक्यात येऊ शकते, अशा ठिकाणी सहज वावर करण्यासाठी रोबोंचा उपयोग केला जात आहे. महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना रोबोटिक्स स्पर्धा प्रकारात चीन, न्युझीलंड, ब्राझील, अमेरिका व इतर आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वोत्कृष्ट कामगिरी बजावली आहे.

याच अनुषंगाने श्री संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयात संस्थेचे अध्यक्ष जे.टी. अग्रवाल, सचिव मधुलता शर्मा यांच्या संकल्पनेतून व प्राचार्य डॉ. आर. पी. सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली अत्याधुनिक रोबोटिक्स लॅबची स्थापना ऑनलाईन पध्दतीने करण्यात आली आहे अशी माहिती महाविद्यालयाचे डीन डॉ.राहुल बारजिभे यांनी दिली आहे. या लॅबमध्ये नवीन तंत्रज्ञानाच्या सुसज्ज मशिनरी, किट्स, डिझायनिंग टूल्स उपलब्ध आहेत. रोबोटिक्स लॅबच्या उभारणीसाठी डॉ.गिरीष कुलकर्णी, प्रा.जे.एस.चौधरी, डॉ.जी.सी.जाधव, प्रा.नितीन खंडारे, डॉ.श्रीकांत चौधरी, प्रा.सुलभा शिंदे, प्रा. संतोष अग्रवाल व कार्यशाळा सहायकांचे मोलाचे सहकार्य लाभले.

नवनवीन संशोधनास चालना: प्रा.अविनाश पाटील 

कृत्रिम तंत्रज्ञानाने मानवापेक्षाही अधिक काम करण्याची शक्ती रोबोंना प्राप्त होत आहे. या तंत्रज्ञानाचा मोठय़ा प्रमाणावर वापर विविध क्षेत्रांत सुरू झाला असून त्यात नवनवे संशोधन या लॅबच्या माध्यमातून होईल. विद्यार्थ्यांच्या तांत्रिक कौशल्यांना चालना मिळेल. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना रोबोटिक्स व ऑटोमेशन या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देण्यात येणार असून, या मार्फत रोजगाराच्या नवनवीन संधी उपलब्ध करून दिल्या जाणार असल्याची माहिती यांत्रिकी विभागाचे विभागप्रमुख प्रा.अविनाश पाटील यांनी दिली.

रोबोटिक्स भारताचे भवितव्य: डॉ.आर.पी.सिंह

‘महाविद्यालयास नुकतीच रोबोटिक्स अभियांत्रिकीला अखिल भारतीय तंत्रशिक्षण परीषदेने मान्यता दिलेली असून नव्याने तयार होणाऱ्या अभ्यासक्रमात विविध कंपनीच्या तंत्रज्ञानाचे मार्गदर्शन घेतले जाणार आहे. यासाठी भारतातील अग्रगण्य इलेक्ट्रॉनिक्स कंपन्यांसोबत करार करण्यात येणार आहेत,’ देशभरात फार थोड्याच महाविद्यालयांना या अभ्यासक्रमाची मान्यता मिळाली असून त्यात गाडगेबाबा अभियांत्रिकीचा समावेश आहे. भुसावळातील विद्यार्थ्यांसाठी करियरचे नवे दालन खुले झाले आहे. जगाला पुरवणाऱ्या जाणाऱ्या रोबोटिक्स तंत्रज्ञानात भारताचा वाटा 40 टक्के असेल म्हणून रोबोटिक्स हे भारताचे भवितव्य आहे असे प्राचार्य डॉ. आर.पी.सिंह यांनी सांगितले.

रोबोटिक्स अभियंत्यांना अत्याधुनिक शस्त्रास्त्रे, औषधीनिर्मिती, अंतराळ संशोधन, नॅनो तंत्रज्ञान अशा क्षेत्रांत करिअरच्या संधी मिळू शकतात. स्पेशलायझेशनमध्ये मशिन ऑटोमेशन, मेडिकल रोबोटिक्स, सायबरमेटिक्स, एअर ट्रॅफिक मॅनेजमेंट अशा काही क्षेत्रांचा ठळकपणे उल्लेख करता येईल. काही पाश्चिमात्य देशांतील कृषी क्षेत्रातही रोबोतंत्रज्ञानावर आधारित विविध यंत्रसामग्रीच्या वापरात सतत वाढ होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.