औद्योगिक उत्पादन निर्देशांक वेब पोर्टलचे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते उद्घाटन

0

जळगाव :- महाराष्ट्र राज्यासाठी औद्योगिक उत्पादन निर्देशांक (Index of Industrial Production, IIP) तयार करण्यासाठी वेब पोर्टलचे उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री तथा मंत्री (वित्त, नियोजन) अजित पवार यांच्या हस्ते मंत्रालयात आज ऑनलाईन संपन्न झाले.

याप्रसंगी उद्योगमंत्री सुभाष देसाई, नियोजन व वित्त राज्यमंत्री शंभुराज देसाई, उद्योग राज्यमंत्री श्रीमती आदिती तटकरे, नियोजन विभाग व उद्योग विभागाचे अप्पर मुख्य सचिव, केंद्रीय सांख्यिकी कार्यालयाचे अधिकारी, उद्योग आयुक्त, अर्थ व सांख्यिकी संचालक, विविध औद्योगिक संस्थांचे प्रतिनिधी, अर्थ व सांख्यिकी संचालनालय व उद्योग संचालनालयाचे सर्व अधिकारी ऑनलाईन उपस्थित होते.

राज्याच्या औद्योगिक विकासाचे उद्यिष्ट साध्य करणे, राज्याचे औद्योगिक धोरण निश्चित करणे, औद्योगिक विकासाच्या योजना ठरविणे यासाठी औद्योगिक क्षेत्रातील चढउतारांचे मोजमाप आवश्यक असते.  महाराष्ट्र हे देशातील औद्योगिकदृष्टया अग्रेसर राज्य असून देशाच्या औद्योगिक उत्पादनामध्ये तसेच एकूण उत्पादनामध्ये राज्याचा हिस्सा मोठा आहे. सदर निर्देशांक राष्ट्रीय तसेच राज्यस्तरीय उत्पन्न काढणे, देशातील/राज्यातील औद्योगिक प्रगती मोजणे यासाठी तसेच नियोजन करण्याच्या उद्देशाने शासनास अत्यंत उपयुक्त आहे. उद्योग जगतास, या क्षेत्रातील संशोधन तसेच उत्पादन करणा-या संस्था यांना नेहमी यांची आवश्यकता भासते. केंद्रीय सांख्यिकी कार्यालयाने दिलेल्या मार्गदर्शक सुचनांप्रमाणे महाराष्ट्र शासनाच्या नियोजन विभागाच्या अधिपत्याखालील अर्थ व सांख्यिकी संचालनालय व उद्योग विभागाच्या अधिपत्याखालील उद्योग संचालनालय यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यासाठी औद्योगिक उत्पादन निर्देशांक तयार करण्यासाठी वेब पोर्टल तयार करण्यात आले आहे.

जिल्ह्यांमधील निवडलेल्या 568 कारखान्यांकडून दरमहा विहित कालावधीत माहिती या वेब पोर्टलवर नोंद करण्याची जबाबदारी उद्योग संचालनालयाच्या महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र यांचेवर सोपविण्यात आली आहे. माहितीवर संस्करण करून राज्याच्या औद्योगिक उत्पादन निर्देशांक अर्थ व सांख्यिकी संचालनालय प्रकाशित करणार असल्याचे प्रमोदराव पाटील, जिल्हा अर्थ व सांख्यिकी अधिकारी, जळगांनी यांनी कळविले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.