उभ्या ट्रकला रिक्षाची धडक ; एकाचा मृत्‍यू

0

जळगाव : कामावरून रिक्षाने घरी जात असताना रस्त्याच्या मध्यभागी उभ्या ट्रकला धडक दिल्याने जखमी झालेल्या तरुणाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याची घटना सोमवारी रात्री उशिरा घडली. रवींद्र मधुकर जोशी (वय ४०) असे या मृताचे नाव आहे. दरम्यान, या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात ट्रकचालक विरोधात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.

शहरातील रामेश्‍वर कॉलनीतील रवींद्र जोशी हे एमआयडीसी कंपनीत मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात. नेहमीप्रमाणे १४ सप्टेंबरला रात्री दहा वाजेच्या सुमारास कामावरून घरी परतण्यासाठी ते रिक्षा क्रमांक (एम.एच.१९. व्ही.७५०१) ने अंजिठा चौफुलीकडून रामेश्वर कॉलनी येथे जात होते. दरम्‍यान जळगाव- औरंगाबाद महामार्गावर हॉटेल त्रिमूर्तीसमोर रस्त्याच्या मध्यभागी उभा असलेल्या नादुरुस्त ट्रक क्रमांक (एम.एच.४१. जी, ५२२९) वर रिक्षा आदळली. यात चालक दिनेश मोहन घोळके यासह प्रवासी रवींद्र जोशी गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती कळताच एमआयडीसी पेालिसांनी धाव घेतली. इम्रान सय्यद, गोविंदा पाटील यांनी जखमींना तत्काळ जिल्‍हा रुग्णालयात हलवून अपघातग्रस्त वाहन ताब्यात घेत वाहतुक सुरळीत केली.

उपाचार सुरू होताच मृत्यू 

जिल्‍हा सामान्य रुग्णालय शहरापासुन लांब असल्याने रात्री बेरात्री रुग्णांना खास करून अपघातात जखमींना वेळीच उपचार मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. औरंगाबाद महामार्गावर अपघात झाल्यावर जखमींना उचलून माघारी अजिंठा चौक, तेथून शिरसोली रेाड मार्गे दहा किलोमीटरवर देवकर अभियांत्रिकी महाविद्यालयात नेण्यात आले. देाघा जखमींची तपासणी करून वैद्यकीय अधिकारी डॉ. अतुल पाटील यांनी उपचाराला सुरुवात केली हेाती इतक्यात रवींद्र जोशी यांची प्रकृती खालावून त्याचा मृत्यू ओढवला.

Leave A Reply

Your email address will not be published.